विज्ञान-रंजन – वार्षिक पाहुणे
>> विनायक
सांगितल्या वेळी न येणं किंवा तसा संदेशही संपर्क माध्यमांनी क्षणक्षण व्यापला असतानाही द्यायला ‘विसरणं’… अरे, जमलंच नाही वगैरे पश्चात दिलगिरी यापैकी प्राणी-पक्षी जगतात काहीही घडत नाही. कारण त्यांच्यापर्यंत आपलं अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचलेलं नाही. त्यांची बुद्धी आणि कल्पनाशक्ती आपल्यासारखी म्हणजे माणूस नावाच्या प्राण्यासारखी तरल नाही. निसर्गानं त्यांना जसं घडवलं त्या नैसर्गिक ऊर्मीसह हे माणूस वगळून इतर सजीवांचं जग ‘सुखेनैव’ जगत असतं. ‘सुखाने’ वगैरेसुद्धा आपण म्हणायचं. त्याचाही त्यांना मागमूस नसतो. असलाच तर उपजत उल्हास किंवा कष्ट. तेही निसर्गाशीच निगडित.
थंडीच्या दिवसात आपल्याकडे येणाऱ्या विविधरंगी, विविध प्रजातींच्या वेगवेगळ्या मोहक, देहबोलीच्या पक्ष्यांचा सहवास अनुभवला तर काही काळ आपल्याला सुखावतो एवढं मात्र खरं. गेल्या वर्षातल्या नोव्हेंबरपासून आतापर्यंत आमच्या मुंबईसारख्या अतिगजबजलेल्या महानगरातील घराच्या खिडकीतूनही रोज सकाळी स्थलांतरित पक्ष्यांची लगबग, किलबिल आणि मोजक्या झाडामाडांवर चाललेली आनंदक्रीडा अनुभवता येतेय. त्यासाठी आपल्याकडे थोडासा वेळ आणि बरीचशी जिज्ञासा मात्र पाहिजे.
एकाच खिडकीतून सूर्याचा उत्तरायण ते दक्षिणायन हा अवकाशतला भासमार्गी प्रवास अनेक वर्षे नजरेने टिपता आला. त्यासाठी उगवती आणि मावळतीच्या काळात ‘सूर्यदर्शन’ घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. हा ‘खेळ’ विनाशुल्क, आनंददायी आणि नकळत वैज्ञानिक सत्य शिकवणाराही असतो. ‘पण वेळ कुठे आहे?’ या सबबीखाली आपण आयुष्यातला साधा आनंद गमावत राहतो. खरं तर अशा वैश्विक आनंदासाठी विशेष काहीच करावं लागत नाही. ‘बालकवीं’च्या नजरेने ‘श्रावण’ महिना अनुभवण्याचा प्रयत्न किती जण करतात? कवितासुद्धा चार भिंतीमध्ये पाठ करून परीक्षेपुरती उरते. उन्हाळ्यात फुलणारी उन्हाळी फुलं, पावसातल्या दऱ्या-डोंगरातल्या रानभाज्या किंवा थंडीच्या मोसमात येणारे आकाशी पाहुणे या सर्वांकडून स्फूर्ती घेण्यासारखं बरंच असतं.
हे पक्षीगण ‘फलना’ची नैसर्गिक पूर्ण करण्यासाठी उबदार प्रदेशाच्या शोधात असतात. आपण ज्याला थंडीचा हंगाम म्हणतो तो अशा पक्ष्यांसाठी उबदार हवेचा आणि प्रजननाचा (ब्रिडिंगचा) काळ असतो. आपल्या समशीतोष्ण देशातील पश्चिम घाटासारखी वैविध्यपूर्ण वनसंपदा जगात क्वचितच कुठे आढळते. त्याने आणि अतिशय उपयुक्त हवामानाने आकर्षित होऊन हे ‘खग’ आपल्या देशाकडे अक्षरशः थव्याने झेपावतात. ऋषीतुल्य पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांनी तर मुंबईत चेंबूरच्या गोल्फ क्लबच्या हिरवळीवर ठरावीक तारखेला वर्षातून एकदाच डेरा टाकणाऱ्या पक्ष्याची नोंद केली होती असं वाचलंय.
मुंबईचं उदाहरण एवढ्यासाठी की, राज्यात आणि देशातही अतिशय गजबजलेलं हे महानगर आहे. काँक्रीटच्या जंगलात हरवत चाललेल्या हिरवाईत फुलं आणि पक्षी कुठे दिसायला? पण मुंबईतलं बोरिवली, ठाणे हे अभयारण्य आणि ठिकठिकाणी असलेली हिरवाईची बेटं हेरून हे पक्षी येत असतात. त्यांचे आकारही अनेक प्रकारचे. रंग तर तऱ्हेतऱ्हेचे. त्यांची रानारानात घुमणारी संकेतदर्शी ‘शील’ काही काळ शहरात ऐकू येते. वडाळा भागातली फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांची वार्षिक भेट तर सुप्रसिद्ध आहे. इतकी की, त्या पक्ष्यांना प्रसंगी त्रास होईल एवढी गर्दी तिथे अनेकदा जमते.
गेल्या काही म्हणजे सुमारे चाळीस वर्षांत केवळ घराच्या खिडकीतून दिसलेले पक्षी म्हणजे तुर्रेदार हुदहुद् (हुप्पु), दयाळ (रॉबिन), खंड्या (किंगफिशर) हा वरून निळसर आणि पोटाशी पिवळसर रंगाचा मासे पकडणारा किंवा सतत शेपूट हलवणारा करडा, पांढरा, काळा धोबी (वॅगटेल), लंब टोकदार चोचीच्या चिमणीपेक्षाही इवलासा मोरपिशी, पिवळा, काळा, पांढरा असा रंगीबेरंगी सूर्यपक्षी (सनबर्ड), गाणारा मखमली टोपीसारख्या डोक्याचा बुलबुल (नाइटिंगेल), मोठा तपकिरी, काळा भारद्वाज (ग्रेटर कॉकल), ‘व्ही’च्या आकारात शेपटी दुभंगलेला आणि इतर पक्ष्यांची नक्कल करणारा कोतवाल (ड्रॉन्गो), मऊ खोडाच्या झाडावर छिद्र पाडणारा रंगीत सुतार (बुडपेकर), ठकठक आवाज करणारा छोट्या काकाकुवासारखा भासणारा, विविधरंगी मोहक तांबट (कॉपरस्मिथ) याशिवाय नेहमीचे कावळा, चिमणी, कबुतर, बगळे वगैरे पक्षी आणि त्यासोबत यंदा चक्क देखणं घुबडही एका झाडावर किंवा रात्रीचं खिडकीत वस्तीला आल्याचं यंदा विशेषत्वानं जाणवलं.
या सर्व पक्ष्यांचं वर्णन डॉ. सलीम अली यांच्या ‘इंडियन बर्ड्स’ या अप्रतिम सचित्र पुस्तकात आहे. मायग्रेटरी किंवा रोहित पक्ष्यासारखे स्थलांतरित फक्त हिवाळ्याचे सोबती. आधी उल्लेख केलेल्या पक्ष्यांमध्ये काही स्थानिक, तर काही स्थलांतरित आहेत. ते सततच्या निरीक्षणातून लक्षात येतं. या निसर्गशोभेमुळे रोजच्या चिंता-तणावापासून काही काळ मुक्ती मिळतेच, पण तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे, पक्षिणी सुस्वरे आळविती’ या उक्तीचा प्रत्यय येतो. तेव्हा सध्याचा मोसम दिवसा आसपास आलेल्या वार्षिक पाहुण्यांच्या दर्शनाचा आणि रात्री आकाशातील तारकादळे पाहण्याचा आहे.
आजकाल हिवाळ्यात अनेक आजाद येतात याला कारण प्रदूषण. ते टाळायचं तर शहरापासून चार दिवस लांब निसर्गसान्निध्यात जायला उत्तम काळ आहे. अतिखर्चिक पर्यटन न करता दऱ्याडोंगरांची मनमुराद पदयात्रा करायला लागतो तो फक्त उत्साह आणि जिद्द. केवळ 5 ग्रॅम वजनाचा व्रॉब्लर हा चिमणी एवढा पक्षी एका झेपेत तीन-चार हजार किलोमीटर उडत सायबेरियापासून इतरत्र जात असेल यापेक्षा स्फूर्तिदायक ते काय!
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List