ठाण्याच्या विकासाचा पाया रचणारे नेतृत्व हरपले; शिवसेना नेते सतीश प्रधान यांना शिवसैनिक, ठाणेकरांची आदरांजली
ठाण्याचे शिवसेनेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि पहिले महापौर, शिवसेना नेते व माजी खासदार सतीश प्रधान यांनी ठाण्याच्या विकासाचा खऱ्या अर्थाने पाया रचला. हे शहर सतत कार्यशील राहिले पाहिजे यासाठी प्रधान यांनी अनेक उपक्रम राबवून ते यशस्वी केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश पूर्ण करण्यासाठी ते कणखरपणे उभे राहिले. प्रधान यांच्या निधनाने शिवसेनाप्रमुखांचा अत्यंत विश्वासू सहकारी हरपला, अशी भावना शिवसेना नेते, माजी मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.
शिवसेना नेते सतीश प्रधान यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. प्रधान यांनीच स्थापन केलेल्या ज्ञानसाधना महाविद्यालयात आज आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, रमाधामचे अध्यक्ष चंदुमामा वैद्य, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे यांच्यासह शिवसैनिक व ठाणेकर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
प्रधान यांच्या निधनामुळे ठाण्यातील ठाणे शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय जडणघडण, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्व मान्यवरांनी व्यक्त केली. सतीश प्रधान यांनी कोणतेही काम हाती घेतले की ते तडीस नेल्याशिवाय स्वस्थ बसत नसत. शिवसेनाप्रमुखांच्या आदेशापुढे त्यांना सर्व गोष्टी गौण होत्या. राजकारणात आता अशी फार कमी माणसे राहिली आहेत, अशी आदरांजली सुभाष देसाई यांनी वाहिली. शिवसेनाप्रमुखांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. रमाधामसाठी त्यांनी भरीव योगदान दिले, असेही देसाई म्हणाले. यावेळी ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश भगुरे, साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे, प्रा. अशोक बागवे, डॉ. प्रज्ञा पवार, माजी आमदार सुभाष भोईर, पत्रकार मिलिंद भागवत, दिग्दर्शक अशोक समेळ, अशोक चिटणीस, विद्याधर ठाणेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
‘रमाधाम’ साठी निधी उभा केला – चंदुमामा वैद्य
माँसाहेबांच्या संकल्पनेतून ‘रमाधाम’ची उभारणी करण्यात येत होती तेव्हा सतीश प्रधान यांनी 2 महिने उभे राहून त्याचे काम स्वतः पहिले. रमाधामसाठी त्यांनी निधीही उभा केला. असे कुठलेही क्षेत्र नाही की त्याला प्रधानांचा स्पर्श झाला नाही. आमचा अत्यंत जवळचा सहकारी हरपल्याचे दुŠख मनात आहे, अशी भावना रमाधामचे अध्यक्ष चंदुमामा वैद्य यांनी व्यक्त केली.
प्रधानांसारखे नेते ठाण्याला हवे आहेत तरच ठाणे पुढे जाईल – मिलिंद बल्लाळ
सतीश प्रधान यांचे ठाण्यावर फार मोठे उपकार आहेत. त्यांनी जसे नेते घडवले तसे असंख्य विद्यार्थीही घडवले. प्रधानांच्या सहा दशकांचे कार्य त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत राहील. प्रधान यांच्यासारखे नेते ठाण्याला हवे आहेत तरच ठाणे पुढे जाईल, असे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाचे प्राणपणाने पालन करणारे नेते
– राजन विचारे
प्रधान यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनच ठाण्यात सक्रिय योगदान दिले. संघटनात्मक बांधणीत झोकून दिले. ठाणे शहराच्या विकासाचा पाया प्रधान यांनी रचला. शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाचे प्राणपणाने पालन करणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. उत्कृष्ट प्रशासक कसा असावा याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. प्रधान यांनी उभारलेल्या वास्तूंमधून त्यांची आठवण चिरंतन राहील, अशी आदरांजली शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी वाहिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List