धनंजय मुंडेंना सहआरोपी करा; मंत्रिमंडळातून हाकला! सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाची मागणी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी पुण्यात सर्वपक्षीय प्रचंड जनआक्रोश उसळला. याप्रकरणी संशयित वाल्मीक कराडसह इतर आरोपींना मंत्री धनंजय मुंडेनी छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप सर्वपक्षीय नेते आणि आंदोलकांनी केला. जोपर्यंत प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेची हकालपट्टी करा, त्यांनाही सहआरोपी करा, अशी एकमुखी मागणी आंदोलकांनी केली. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत राज्यभर मोर्चे सुरूच ठेवण्याचा निर्धार मोर्चात व्यक्त करण्यात आला.
पुण्यातील लाल महाल येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते आणि नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. मुस्लिम, दलित आणि सर्व जातीधर्माच्या नागरिकांची मोर्चात लक्षणीय उपस्थिती होती. विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. ‘न्याय द्या, न्याय द्या, संतोष देशमुख यांना न्याय द्या!’, ‘धनंजय मुंडे राजीनामा द्या!’, ‘आरोपी वाल्मीक कराडला फाशी द्या!’, ‘बीडचा बिहार थांबवा, हत्या प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवा!’ अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला. मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी, भाऊ धनंजय देशमुख, त्याचबरोबर त्यांची बहीण सहभागी झाली होती.
अजितदादा डोळे उघडून बघा – आमदार सुरेश धस
उपमुख्यमंत्री अजित पवार खूप प्रांजळ मनाचा माणूस आहे. ते कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाहीत, मात्र अजित पवारांचे धनंजय मुंडेजवळ काय अडकले आहे, असा सवाल आमदार सुरेश धस यांनी भर सभेमध्ये उपस्थित केला. अजितदादा डोळे उघडून बघा, खाली काय चालले आहे. हवे तर तुमची बारामतीतील 200 विश्वासू माणसे खात्रीसाठी परळीला पाठवा. मंत्री मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, असेही ते म्हणाले.
संतोष देशमुख हत्येशी संबंधित सर्वांचे राजीनामे घ्या – पृथ्वीराज चव्हाण
राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. संतोष देशमुख हत्येतील सर्व संबंधितांचे मुख्यमंत्र्यांनी राजीनामे घेतले पाहिजेत. राज्यामध्ये गुंतवणूकदार येत आहेत. त्यांच्याकडे जर खंडणी मागितली जात असेल तर कोणीही महाराष्ट्रात येणार नाही. हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या घटनांमागे जो मंत्री असेल तर त्याचा राजीनामा घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पुण्यातील जनआक्रोश मोर्चामध्ये पृथ्वीराज चव्हाण सहभागी झाले होते.
आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत? – मनोज जरांगेंचा सवाल
संशयित आरोपी वाल्मीक कराडसह अन्य दोन आरोपींना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत, असा सवाल यावेळी मराठी क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर मराठे शांत आहेत. आम्हाला लोक खूप त्रास देत आहेत. जर यातील एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांनी मराठय़ांना धोका दिला असा संदेश जाईल. त्यामुळे सर्वांना शिक्षा द्या, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली. दरम्यान, चुलतभावाच्या अपघाती निधनामुळे जरांगे-पाटील यांनी लाल महल या ठिकाणी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर ते भावाच्या अंत्यसंस्कारासाठी गावी रवाना झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List