लाडक्या बहिणींचा तिजोरीवर ताण, शेतकरी कर्जमाफी आता शक्य नाही! कृषिमंत्र्यांनी हात वर केले
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता लाडकी बहीण योजनेचे कारण सांगून त्यात चालढकल केली जात आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडला असून आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येऊ शकेल, असे म्हणत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी हात वर केले आहेत.
महिलांना एकाच वेळी दोन योजनांचा लाभ नाही
राज्याची आर्थिक स्थिती सध्या तितकीशी चांगली नाही. त्यामुळे सध्या तरी शेतकऱयांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही, असे कोकाटे म्हणाले. लाडक्या बहिणींना एकाच वेळी दोन योजनांचा लाभ देऊ नये. अनेक महिला शेतकरी महासन्मान आणि लाडकी बहीण अशा दोन्ही योजनांचा लाभ घेत असून त्यापैकी एकाच योजनेचा लाभ त्यांनी घ्यावा आणि त्याचा निर्णय त्यांनीच घ्यावा, असे कोकाटे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अनपेक्षित बहुमतामागे लाडकी बहीण योजनेचे मोठे योगदान असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी म्हटले होते. लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करण्यात येईल असेही महायुतीने निवडणुकीपूर्वी सांगितले होते. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडू लागल्याने अन्य योजनांसाठी पुरेशा निधीची तरतूद सरकारला करता येत नसल्याची टीका होऊ लागली आहे.
देशाच्या महालेखापालांनीही (कॅग) राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर ताशेरे ओढले आहेत. सरकारच्या जमाखर्चात ताळमेळ नसल्याचे ‘कॅग’ने म्हटले आहे. राजकोषीय तूट दोन लाख कोटींवर पोहोचली आहे. मागील सरकारच्या अनेक योजनांमुळे राज्यावर हे आर्थिक संकट आले असल्याचे ‘कॅग’ने नमूद केले आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करण्याचा निर्णय घेण्याची वेळ त्यामुळेच सरकारवर आल्याचे सांगितले जाते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List