…अन् सभागृहात अवतरल्या शेकडो सावित्रीबाई, आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल सुरू
अंगावर हिरवे इरकल, कपाळी आडवा गंध, हाती पुस्तक, ओठी सावित्री-ज्योतीचा जागर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई व फातिमाबी शेख यांच्या वेशभूषेतील कवी-कवयित्रींनी सादर केलेल्या काव्यरचना, सावित्री-ज्योती, आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत गुरुवारी पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलला सुरुवात झाली.
कवी विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलला आज सुरुवात झाली असून ५ जानेवारीपर्यंत एस. एम. जोशी सभागृह येथे हे फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. महाराष्ट्रासह देशविदेशातून सहाशे कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत.
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. देश-विदेशातील सहाशे कवींचा काव्य महोत्सव, भिडेवाडा या विषयावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगीतिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम फेस्टिव्हलमध्ये होणार आहेत. लंडन, ऑस्ट्रेलिया, अबूधाबी आदी देशांतून, तसेच केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, तेलंगणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतून कवी-कवयित्री या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List