अजित पवार यांचा 20 हजार मतांनी पराभव, उत्तम जानकर यांचा दावा
विधानसभा निवडणुकीत दीडशे मतदारसंघांत गडबडी करण्यात आली आहे. बारामती मतदार संघातूनदेखील अजित पवार यांचा 20 हजार मतांनी पराभव झाल्याचे धक्कादायक विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱयावर होते. त्या वेळी जानकर यांनी गोविंद बाग येथे शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.जानकर म्हणाले, महायुतीचा जेवढय़ा मतदारसंघात विजय झाला आहे त्याची सखोल माहिती घेतल्यानंतर बारामती मतदारसंघातून अजित पवार यांचा 20 हजार मतांनी पराभव झाला आहे. अजित पवारांना 1 लाख 80 हजार जी मते पडली त्यापैकी दोनास एक असे प्रपोजल लावले होते. त्यामुळे युगेंद्र पवारांची मते 80 हजार अधिक 60 ही 1 लाख 40 हजार आहेत आणि अजित पवारांमधील 60 हजार वजा होतात.
सखोल अभ्यास केल्यानंतर जयकुमार गोरे यांच्या बाबतीत एकास पाच प्रपोजल लावले आहे. गोरे यांना 1 लाख 48 हजार मते पडली. तर घाडगे यांना 1 लाख 3 हजार मते आहेत. घाडगे यांचीसुद्धा 30 हजार मते चोरली गेली. त्यामुळे घाडगे एक लाख 33 हजारावर येतात आणि गोरे 1 लाख 21 हजारांवर येतात.
चार महिन्यांच्या आत महायुतीचे सरकार जमीनदोस्त?
दिल्लीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुल गांधी आम्ही सगळे मिळून निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत. त्यांना या सर्व बाबी निदर्शनास आणून देणार आहोत. चार महिन्यांच्या आत महायुतीचे सरकार जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळेल. त्या दृष्टीने व्यूहरचना आखली असल्याचेही जानकरांनी सांगितले. ते म्हणाले, व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली पाहिजे. कोणत्याही स्थितीत आम्ही ती घेतल्याशिवाय राहणार नाही. सरकारने राजीनामा दिला पाहिजे, ते देत नसतील तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. त्याच ठिकाणी पोटनिवडणूक घेतली पाहिजे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List