‘फक्त कपड्याचा रंग निळा असला म्हणजे…’, परभणी दौऱ्यावरून नारायण राणेंचा राहुल गांधींना सणसणीत टोला
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज परभणी दौऱ्यावर आहेत. त्यांनी कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली. पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत. मी कुटुंबाला भेटलो, त्यांनी मला पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवला, व्हिडीओ दाखवले. 99 टक्के नाही तर 100 टक्के ही हत्याच आहे. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण केली. ते दलित असल्यामुळे त्यांना मारहाण झाली असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान राहुल गांधी हे जेव्हा सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले तेव्हा ते वाहानाच्या मोठ्या ताफ्यासह परभणीत दाखल झाले होते. त्यांनी अंगामध्ये निळा शर्ट घातला होता. यावरून आता भाजप खासदार नारायण राणे यांनी राहुल गांधी यांना जोरदार टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले नारायण राणे?
राहुल गांधींना महाराष्ट्र कळालेला नाहीये, राहुल गांधी यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरी कळलेत का? कपड्याचा रंग निळा असला म्हणजे तो आंबेडकरवादी होत नाही. कपड्यांच्या आत त्यासाठी काहीतरी लागतं, असा हल्लाबोल यावेळी नारायण राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ आम्हाला सीनियर होते, त्यामुळे आम्ही त्यांच्या गटामध्ये होतो. दिल्लीतली हवा चांगली आहे, म्हणून कदाचित भुजबळ यांना दिल्लीत बोलवलं असेल. भुजबळ साहेबांनी फडणवीस यांची भेट घेतली त्याबद्दल त्यांना शुभेच्छा असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान नितेश राणे यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली, यावर बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं की, नितेश राणे मंत्री झाले त्याचा मला फार आनंद आहे, दोन मुलं आमदार त्यापैकी एक मंत्री, आणि बाप खासदार देशात असं समीकरण कुठेच नाही, त्यामुळे मी फार खुश आणि समाधानी आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List