पोटाची खळगी भरण्यासाठी पाच हजार आदिवासींनी घर सोडले, मुरबाडमधील वाढेपाडे पडले ओस
गोरगरीबांच्या हाताला त्यांच्या गावातच काम मिळावे यासाठी सरकारने रोजगार हमी योजना सुरू केली. मात्र ग्रामीण भागात कोणताही रोजगार मिळत नसल्याने मुरबाडमधील तब्बल पाच हजार आदिवासींनी आपल्या कुटुंबकबिल्यासह गाव सोडले आहे. आदिवासींनी पोटाची खळगी भरण्यासाठी परजिल्ह्यातील वीटभट्ट्यांवर हजेरी लावली आहे. त्यामुळे आदिवासी वाड्या ओस पडल्या असून येथे स्मशान शांतता पसरली आहे. गावातच रोजगार देण्याचे सरकारचे आश्वासन फोल ठरत असल्यानेच हा फटका बसत आहे.
भातशेतीची कामे उरकली की गावात कोणताच रोजगार नसतो. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर उजाडला की दरवर्षी किमान पाच हजार कुटुंबे चिल्यापिल्यांसह घर सोडतात. घर सोडून गेलेले आदिवासी आता थेट जून महिन्यातच आपल्या घराकडे वळतात. यावर्षीदेखील मुरबाडमधील हजारो आदिवासींचे तांडे वीटभट्ट्यांवरील कामासाठी ठाणे, नाशिक, पनवेल या भागात गेले आहेत. त्यामुळे मुरबाडमधील बहुतांशी आदिवासी पाडे ओस पडू लागले. रोहयोतील कामे कागदावरच असल्याने ग्रामीण भागात हाताला काम मिळत नाही आणि हाताला काम मिळालेच तर वेळेत मजुरी दिली जात नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने दरवर्षी आदिवासी आपली घरेदारे सोडून अन्यत्र स्थलांतरित होतात.
‘बयाना’ देऊन बांधले जातात हात
आदिवासी कुटुंबे आठ महिने वीटभट्ट्यांवर मजुरी करतात. मात्र तुटपुंज्या मजुरीमुळे राबराबूनही हाती काहीच राहत नसल्याने वीटभट्टीमालक पावसाळ्यात आपल्या घरी परतणाऱ्या या मजुरांना पुढील वर्षाचा बयाना आगाऊ देतात. त्यामुळे डिसेंबर महिना उजाडताच वीटभट्टीवाल्यांच्या गाड्या दारासमोर उभ्या राहतात. ‘बयाना ‘च्या नावाने उचल घेतल्याने हात बंधलेल्या आदिवासींना नाईलाजाने आपले पाडे सोडावे लागत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List