मुंबई विमानतळाचा प्रवासी सेवेत नवा विक्रम ! नोव्हेंबरमध्ये 47 लाख 70 हजार प्रवाशांची वर्दळ
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने प्रवासी सेवेत नवा विक्रम नोंदवला आहे. नोव्हेंबर महिन्यात तब्बल 47 लाख 70 हजार प्रवाशांनी मुंबई विमानतळावरून ये-जा केली. यात 34 लाख प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केला, तर आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवर प्रवास केलेल्या प्रवाशांची 13 लाख 70 हजार इतकी नोंद झाली. विमान प्रवाशांच्या विक्रमी संख्येने मुंबई विमानतळावरील उत्तम प्रवासी सेवेबरोबरच देश व विदेश पातळीवर मुंबईचे वाढते महत्त्व अधोरेखित केले आहे.
अद्ययावत सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या मुंबई विमानतळावर प्रवाशांचा ओघ दिवसेंदिवस वाढताच आहे. अलीकडच्या काही वर्षांत मुंबईत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे प्रमाण वाढले आहे. उड्डाणे आणि प्रवासी संख्येत झालेली वाढ हाताळण्यात मुंबई विमानतळ यशस्वी ठरले आहे. गेल्या महिन्यात मुंबईसह देशातील इतर प्रमुख विमानतळांची प्रवासी संख्या समोर आली आहे. त्यात मुंबई विमानतळाची लक्षणीय कामगिरी दिसून आली. उपलब्ध माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 27,200 विमानांनी ये-जा केली. त्यात 19,696 देशांतर्गत उड्डाणे, तर 7,504 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश होता. विशेषतः सण-उत्सव काळात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची अधिक वर्दळ होती.
27 नोव्हेंबर ठरला सर्वात व्यस्त दिवस
गेल्या काही वर्षांत मुंबई विमानतळाची उड्डाणे हाताळण्याची क्षमता चांगलीच वाढली आहे. 27 नोव्हेंबर रोजी एका दिवसात तब्बल 941 उड्डाणे हाताळण्यात मुंबई विमानतळाला यश आले. विमान उड्डाणांच्या बाबतीत 27 नोव्हेंबर हा सर्वात व्यस्त दिवस ठरला. देशांतर्गत पातळीवर इतर शहरांच्या तुलनेत दिल्ली, बंगळुरू आणि गोवा या ठिकाणी मुंबईहून जास्त विमानांनी ये-जा केली. व्यावसायिक प्रवासी तसेच पर्यटक अशा दोन्ही प्रवर्गांतील प्रवाशांनी या तिन्ही ठिकाणांना अधिक पसंती दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List