पतीच्या परवानगीशिवाय पत्नीच्या नातेवाईकांनी घरात राहणे ‘क्रूरता’; कोलकाता हायकोर्टाचा निर्वाळा
पतीच्या परवानगीशिवाय पत्नीच्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी घरात अधिक काळ राहणे ही पतीच्या बाबतीत क्रूरता आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. घटस्फोटाच्या प्रकरणात न्यायालयाने पतीच्या बाजूने निकाल दिला. न्यायमूर्ति सब्यसाची भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने पतीच्या याचिकेवर सुनावणी केली आणि दाम्पत्याला क्रूरतेच्या आधारे घटस्फोट मंजूर केला.
कनिष्ठ न्यायालयाने पतीला घटस्फोट देण्यास नकार दिला होता. तो निर्णय उच्च न्यायालयाने चुकीचा ठरवला आणि घटस्फोटासाठी पतीने केलेली विनंती मान्य केली. महिलेच्या आई-वडिलांनी किंवा तिच्या मित्रमंडळींनी तिच्या पतीच्या घरात येऊन राहणे ही क्रूरताच आहे, असे न्यायमूर्ती भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने नमूद केले. पतीच्या शासकीय निवासस्थानी महिलेचे नातेवाईक आणि मित्रमंडळी दीर्घकाळ येऊन राहिले. त्यांच्या मुक्कामावर पतीने आक्षेप घेतला होता. त्यानंतरही महिलेने आपल्या माहेरच्या लोकांना आणि मित्रमंडळींना घरात ठेवून घेतले. ही बाब न्यायालयाने गांभीर्याने विचारात घेतली.
काय आहे प्रकरण?
पश्चिम बंगाल येथील रहिवाशी असलेल्या दाम्पत्याचे 2008 मध्ये नबद्वीप येथे लग्न झाले होते. लग्नानंतर दाम्पत्य कोलाघाट येथे गेले. काही दिवसांनी पत्नीने तिचे कार्यालय नरकेलडांगा येथे स्थलांतरित झाल्याने तिथे राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ती नरकेलडांगा येथे राहण्यास गेली. मात्र तिचे नातेवाईक आणि मित्रमंडळी कोलाघाट येथील पतीच्याच शासकीय निवासस्थानी राहत होते. यावर पतीने आक्षेप घेतला होता. पत्नी माझ्यापासून अलिप्त राहत आहे. तिला वैवाहिक संबंध ठेवण्यास किंवा मूल होऊ देण्यास रस नाही, याकडेही पतीने याचिकेद्वारे न्यायालयाचे लक्ष वेधले होते. संपूर्ण वस्तुस्थिती विचारात घेत न्यायालयाने क्रूरतेच्या आधारे पतीला घटस्फोट मंजूर केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List