महिनाभरात सेवा सुधारा अन्यथा 26 जानेवारीला “टॉवरवरून” आंदोलन, युवासेनेचा BSNL ला इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या BSNL सेवेचे तीनतेरा वाजले असून बहुसंख्य भागात नेटवर्क अभावी मोबाईल सेवा खंडीत झाल्याचे चित्र आहे. कुडाळ तालुक्यातील बीएसएनएल सेवा रुग्णशय्येवर आहे. तातडीने बीएसएनएलची सेवा सुधारावी, अन्यथा याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 26 जानेवारी रोजी कुडाळ येथे युवासेनेकडून मोबाईल टॉवरवर चढून लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना जिल्हाप्रमुखांनी बीएसएनएल विभागाला दिला आहे.
ठराविक उद्योगपतींची भरभराट व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळेच बीएसएनएल सक्षम होण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. नादुरुस्त झालेले मोबाईल टॉवर्स जाणीवपूर्वक दुरुस्त करण्यात येत नाहीत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते विनायक राऊत खासदार असताना त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोबाईल टॉवर मंजूर करून घेतले होते. मात्र त्याच्या पूर्ततेकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. मोबाईल सेवेची अशी अवस्था असताना लँड लाईन सेवा देखील मृतवत झाली आहे. मोबाईल आणि लँड लाईन सेवा शेवटच्या घटका मोजीत असल्यामुळे इंटरनेटची सुविधा घेण्यात देखील अडथळे येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा दुर्गम जिल्हा आहे. येथे आधीच मोबाईल नेटवर्कची बोंब असते. त्यातच भरवशाच्या बीएसएनएल सेवेने दगा दिला आहे. इंटरनेट सेवेचा खोळंबा होत असल्यामुळे सरकारी कामे देखील अडून पडली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वारंवार खेटे मारावे लागत आहेत. तसेच व्यापारी वर्गाला देखील बीएसएनएलच्या या सर्व्हिसमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोबाईलवर येणारे ओटीपी तसेच बँकेचे ट्रांजेक्शन होणारे मेसेज देखील उशिरा येत आहेत. येत्या महिनाभरात बीएसएनएलने सर्व समस्या सोडवल्या नाहीत तर त्यांचे लक्ष वेधण्यासाठी 26 जानेवारी रोजी कुडाळ येथे बीएसएनएल टॉवरवर चढून युवा सेनेच्या माध्यमातून लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी निवेदनातून बीएसएनएल विभागाला दिला आहे.
“बीएसएनएल ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा देणारी सर्वात जुनी आणि विश्वासार्ह कंपनी आहे. सुरुवातीपासून जिल्ह्यात या एकाच कंपनीची सेवा सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य ग्राहक बीएसएनएल ग्राहक आहेत. मात्र केंद्र सरकारने मोबाईल सेवा खासगी कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी बीएसएनएलचे जाणीवपूर्वक नुकसान केले आहे,” असा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी यावेळी केला. यासंदर्भात युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयात सोमवारी सब डिव्हिजन इंजिनिअर बलवंत कुमार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक उदय मांजरेकर, ओबीसी सेल शहर प्रमुख राजू गवंडे, युवा सेनेचे शहर प्रमुख संदीप महाडेश्वर, गुरु गडकर, प्रथमेश राणे आदी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List