शेतकऱ्यांचा दिल्ली मार्च रोखला, शंभू सीमेवर धुमश्चक्री; 8 शेतकरी जखमी
मोदी सरकारने आज पुन्हा दमनशाहीचे दर्शन घडवले. शेतमालाला किमान हमीभाव मिळण्यासह एकूण 13 मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने पायी निघालेल्या 101 शेतकऱ्यांच्या मोर्चावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या व पाण्याचा प्रचंड मारा केला. हरयाणा सुरक्षा दल आणि पोलिसांच्या या हल्ल्यात आठ शेतकरी जखमी झाले. त्यामुळे अखेर पायी मोर्चा आजचा दिवस स्थगित करण्यात आला.
आंदोलनाची पुढील दिशा शेतकऱ्यांची बैठक घेऊन ठरवण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत दिल्लीत धडक देण्यावर शेतकरी ठाम असल्याचे पंजाबमधील शेतकरी नेते सरवन सिंग पंधेर यांनी सांगितले.
जखमी शेतकऱ्यांना चंदिगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सरवन सिंग पंधेर यांनी सांगितले. पंजाबच्या 101 शेतकऱ्यांचा पायी मोर्चा आज दुपारी 12 वाजता शंभू बॉर्डर येथून दिल्लीच्या दिशेने निघाला, परंतु एका पुलावर हरयाणा पोलिसांनी हा मोर्चा रोखला. जवळपास चार तास मोर्चा रोखून धरल्यानंतर अखेर शेतकऱ्यांनी मोर्चा तूर्त थांबवला.
सुरुवातीला पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. हरयाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना ते विनापरवानगी दिल्लीत धडक देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचा मारा केला. या हल्ल्यात आठ शेतकरी जखमी झाले. दरम्यान, शेतकऱ्यांचे आंदोलन थंड करण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांवर फुलांचा वर्षाव करण्याचाही प्रयत्न केला.
पोलिसांनी रबराच्या गोळ्या मारल्या
जखमी शेतकऱ्यांना ऑक्सिजन लावून रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी रबराच्या गोळ्यांचा मारा केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असून एका शेतकऱ्याच्या डोक्याला अश्रुधुराच्या नळकांड्याचा मार लागला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याचे शेतकरी नेते सरवन सिंग पंधेर यांनी म्हटले आहे.
हरयाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी पुलावर आणि पुलाखाली तब्बल एक हजार जवान तैनात केले आहेत. तीन अजस्त्र वाहनेही तैनात असून अश्रुधुराच्या नळकांड्या मोठ्या प्रमाणावर तैनात ठेवण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्याची प्रकृती गंभीर
एक शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे शेतकरी नेते सरवन सिंग पंधेर यांनी सांगितले. शेतकरी मोर्चा तूर्त थांबवण्यात आला असून उद्या बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल, असे ते म्हणाले. 6 डिसेंबर रोजीदेखील शेतकऱ्यांनी दिल्लीत धडक देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही मोर्चा दडपशाहीने रोखण्यात आला.
शंभू बॉर्डरवरील अडथळे हटवा; सर्वोच्च न्यायालयात याचिका
हरयाणा-पंजाब येथील शंभू बॉर्डरवरील शेतकऱ्यांना रोखण्यासाठी लावण्यात आलेले अडथळे तत्काळ काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पंजाबमधील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील अडथळ्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असून नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हे अडथळे तत्काळ काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List