विदेशी कुत्र्यांवर सट्टा; 81 जणांना अटक, पोलिसांचा फार्म हाऊसवर छापा; 19 कुत्रे, 15 वाहने जप्त
विदेशी जातीच्या कुत्र्यांवर सट्टा खेळल्याप्रकरणी राजस्थानमधील हनुमानगड येथून तब्बल 81 जणांना अटक करण्यात आली आहे. 19 कुत्र्यांसह 15 वाहने पोलिसांनी जप्त केली. राजस्थान पोलिसांनी रात्रीच्या वेळी हनुमानगड येथील एका फार्म हाऊसवर छापा टाकला असता सर्व प्रकार उघडकीस आला. विदेशी जातीच्या कुत्र्यांवर सट्टा खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांची चाहूल लागताच अनेकांनी घटनास्थळावरून पळ काढला.
250 सदस्यांचा ग्रूप
बहुतांश आरोपी हे पंजाब आणि हरयाणामधील असून ते विदेशी कुत्र्यांसह फार्म हाऊसवर पोहोचले होते. छाप्यादरम्यान अनेक कुत्रे जखमी अवस्थेत सापडले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपींविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी सोशल मीडियावर ग्रूप तयार केला होता, ज्यात 250 सदस्य आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List