दहशतवादाविरोधात परस्पर सहकार्य वाढवणार, नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान
सीमेपलीकडच्या दहशतवादाचा निषेध करतानाच या प्रकरणी परस्पर सहकार्य वाढवण्यावर हिंदुस्थान आणि कुवेतमध्ये एकमत झाले. या प्रकरणी दोन्ही देशांकडून संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे. दहशतवादाला आर्थिक रसद पुरवणारे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यावरही दोन्ही देशांकडून सहमती झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानकडून जम्मू-कश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये दहशतवादाविरोधात परस्पर सहकार्य वाढवण्यावर एकमत झाले. दरम्यान, कुवेत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.
कुवेतचे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल जाबेर अल सबाह यांनी त्यांना हा सन्मान दिला. या भेटीदरम्यान संरक्षणाच्या दृष्टीनेही दोन्ही देशांमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर महत्त्वपूर्ण करार झाले. दौऱ्याबाबत मोदींनी एक्सवरून पोस्ट लिहून कुवेतच्या आमीरांचे आभार मानले आहेत. कुवेतच्या आमीरांसोबत छान भेट झाली. आम्ही फार्मास्युटिकल्स, आयटी, फिनटेक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा केली. मला आशा आहे की आमची मैत्री आगामी काळात आणखी घट्ट होईल, असे मोदींनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List