सिरीयातून असदला पळून जावं लागलं तसं आपल्या देशात झाल्याशिवाय राहणार नाही, संजय राऊत यांचा घणाघात
मारकडवाडीतून ईव्हीएमविरोधात जी ठिणगी पेटली आहे त्या ठिणगीचा वणवा पेटणार व त्या वणव्यात भ्रष्ट मार्गाने जे सत्तेवर येतायत ते नष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्याप्रमाणे असे उद्योग केल्यामुळे सिरीयातून असदला पळून जावं लागलं तसं आपल्या देशात, महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.
लाडकी बहिण योजनेच्या फॉर्मची आता पडताळणी केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, पैसे आणणार कुठून हे नवीन सरकारच्या लक्षात आल्यामुळे आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उत्पन्नाची साधनं काय आहेत यांच्याकडे. आता आमची फक्त एवढीच प्रार्थना आहे की ज्यांना पैसे दिले त्यांना नोटीसी पाठवून पैसे परत मागवू नका, असा टोला त्यांनी लगावला.
बेळगावमध्ये कर्नाटकसरकारकडून सुरू सीमावासियांवर दडपाशीचे प्रकार सुरू आहेत. त्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे व चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ” याआधीच्या सरकारम्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सीमा भागाचा विशेष कार्यभार होता. एकनाथ शिंदे यांनी कधीही सीमावासियांची गाऱ्हाणी ऐकली नाही. मी स्वत: गेलो होतो तेव्हा मला अटक केलेली. माझ्यावर कारवाई झाली पण मी घाबरलो नाही. पण आपल्याला अटक होईल, पोलिसांचे दंडुके खावे लागतील म्हणून तेव्हाचे हे मंत्री गेले नाही. त्यावेळी माझ्यासह अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले, असे संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List