कबुतरांना खाऊ घालणे अंगलट, धान्य टाकणाऱ्यांकडून 25 हजारांचा दंड वसूल
शहरात कबुतरे, पारव्यांचा त्रास दिवसेंदिवस अधिकच वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी कबुतरे, पारव्यांना धान्य टाकू नये, असे आवाहन महापालिकेने केले होते. मात्र, त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांकडून महापालिकेने 58 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरातील विविध भागांमधून 38 प्रकरणांमध्ये हा दंड वसूल करण्यात आला असून पुन्हा धान्य टाकताना आढळून आल्यास त्यांच्याकडून वाढीव दंड आकारण्यासाठी पालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत.
सतत कबुतरे, पारव्यांच्या संपर्कात आल्याने कबुतरे, पारव्यांची पिसे, विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुंमुळे नागरिकांना ‘लंग्स पायब्रोसिस, ‘हायपरसेंसिटिव्ह न्यूमोनायटिस’ यासारखे फुप्फुसाचे विकार उद्भवत असल्याचे निरीक्षण श्वसनरोग तज्ज्ञांनी नोंदवले होते. एवढेच नाही तर काही जणांची फुप्फुसे निकामी होत असल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले होते. त्यामुळे कबुतरांना जितके लांब ठेवता येईल तेवढे लांब ठेवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला होता. त्यातच गेल्या काही महिन्यांमध्ये कबुतरांची पिसे, विष्ठेमुळे उद्भवणाऱ्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याची गंभीर दखल घेत कबुतरे, पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले होते. त्यानुसार धान्य टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाने कबुतरे, पारव्यांना धान्य टाकणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी, त्यांना होणाऱ्या कारवाईची माहिती देण्यासाठी पथके तयार आहेत.
या ठिकाणी कारवाई
कोथरूड, वारजे माळवाडी, नदीपात्र परिसर, अष्टभुजा घाट, नेने घाट परिसर, स्वारगेट परिसर, सारसबाग परिसरात कबुतरे-पारवे बसतात. त्यामुळे याठिकाणी धान्य टाकणाऱ्यांकडून पालिकेने दंड वसूल करण्यास सुरुवात केली असून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, या नियमाखाली हा दंड वसूल केला जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List