नाराज शिलेदारांना एकनाथ शिंदेंकडून श्रद्धा, सबुरीचा सल्ला; नेमकं काय दिलं आश्वासन?
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. मात्र मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर अनेक दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे महायुतीमधील मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या आमदारांसोबतच सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला. मात्र या मंत्रिमंडळ विस्ताराने महायुतीमधील अनेक आमदारांचा अपेक्षाभंग केला.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपदासाठी दावेदार असलेले मात्र संधी न मिळू शकलेले शिवसेनेतील अनेक नेते नाराज आहेत, यातील काहींनीतर आपली नाराजी उघडपणे बोलून देखील दाखवली होती. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली, त्यामुळे काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला. यामध्ये शिवसेनेचे नेते तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे अशा अनेक नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान आज विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मी विश्वासाने सांगतो, ज्यांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळालं नाही ते पक्षाचं काम करतील, संघटना वाढवण्यासाठी काम करतील, दुसऱ्या टप्प्यात त्यांना मंत्रिपद मिळेल. ज्यांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळाले आहे, ते दुसऱ्या टप्प्यात पक्षासाठी काम करतील. मंत्रिपदासाठी श्रद्धा, सबुरी ठेवावी लागते. मंत्रिमंडळात संधी नाही मिळाली त्यांना पक्ष संघटनेत स्थान मिळेल. आता आमची जबाबदारी वाढली आहे. शिवसेना एक कुटुंब आहे, त्यामुळे कोणी कुठेही जाणार नाही. पद येतात जातात, पदापेक्षा आमचं उत्तरदात्वीय हे लोकांशी जी नाळ जोडली आहे त्याच्याशी आहे. अडीच वर्षात आम्ही तेच केलं प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काल कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला दोन परप्रांतीय कुटुंबाकडून मारहाण करण्यात आली, यावर देखील एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कल्याणच्या घटनेबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली आहे, संबंधितांवर कारवाई देखील केली आहे. मराठी माणसांची अस्मिता जपण्यासाठीच शिवसेनेची निर्मिती झाली आहे, महाराष्ट्रात मराठी माणसाचा कोणालाही अपमान करता येणार नाही, कोणाचाही मुलाहीजा ठेवला जाणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List