उद्धव ठाकरे यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांचे औदार्य, आर्थिक अडचणीत आलेल्या उद्धव सेनेला करणार ही महत्वाची गोष्ट परत
शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कटुता जगजाहीर आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर नेहमी घणाघाती हल्ला करत असतात. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्ही नेते सोडत नाही. राज्यातील कटुतेच्या या राजकारणात चांगली बातमी आली आहे. या बातमीमुळे उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांनी 2022 पूर्वी बँकेत असलेल्या शिवसेनेच्या खात्यातील रक्कम उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची माहितीही त्यांच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आली आहे, असे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे.
एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय
2022 मध्ये शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांना घेऊन बंड पुकारले. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांचा दावा मान्य करत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिला. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची संपत्ती आणि बँकेतील रक्कमेवर दावा करणार नसल्याचे सांगितले होते. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी 2022 पूर्वी शिवसेनेच्या बँक खात्यात असणारी रक्कम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्याचा निर्णय घेतला आहे.
बँकेतील रक्कम उद्धव ठाकरे यांना मिळणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बंडखोरीनंतर आर्थिक अडचणीत आला. यामुळे एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. दोन्ही पक्षातील राजकीय कटुता विसरुन नवीन उदाहरण एकनाथ शिंदे यांनी ठेवले आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे 2022 पूर्वी बँकेत असणारी रक्कम येणार आहे.
अडीच वर्षापूर्वी झाले होते बंड
20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणारे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करुन सरकार बनवले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्यात आली. त्यात महायुतीला 230 जागा मिळाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List