हिंदुस्थानविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरा बांगलादेशचा भाग!
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार महफूज आलम यांनी 16 डिसेंबर 1971 च्या विजय दिवसानिमित्त हिंदुस्थान विरोधात वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले. विजय दिवस हा बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामातील बांगलादेशींनी पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. त्याच दिवशी महफूजने सोशल मीडियावर हिंदुस्थानविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पोस्टमध्ये महफूज आलम म्हणाला होता की, ईशान्य आणि उत्तर हिंदुस्थानात सांस्कृतिक असंतोष भडकवण्याचा प्रयत्न केला. सोबतच एक वादग्रस्त नकाशा जारी करण्यात आला. ज्यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरा बांगलादेशचा भाग दाखवण्यात आला होता. वाद वाढल्यानंतर महफूजने त्याची पोस्ट डिलीट केली. महफूज आलम यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दावा केला की, ईशान्य हिंदुस्थान आणि बांगलादेशातील लोकांची संस्कृती धर्माव्यतिरिक्त समान आहे. शिवाय हिंदुस्थानातील उच्चवर्णीय आणि हिंदू कट्टरतावाद्यांच्या वृत्तीमुळे पूर्व पाकिस्तानची निर्मिती झाली होती, असा आरोप त्यांनी केला. महफूजने आपल्या पोस्टमध्ये 1975 आणि 2024 च्या घटनांची पुनरावृत्ती करण्याची गरज व्यक्त केली.
1975 मध्ये बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली होती. महफूज यांनी 2024 मध्ये शेख हसिना यांना सत्तेवरून हटवण्याची कथित योजना लोकशाही विरोधात असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, या घटनांमध्ये 50 वर्षांचे अंतर आहे. मात्र परिस्थिती बदललेली नाही. यावेळी बांगलादेशाला नवीन व्यवस्था आणि भूगोलाची गरज असल्याचा दावा महफूज यांनी केला.
महफूज यांनी फेसबुकवर एक वादग्रस्त नकाशा शेअर केला आहे, ज्यामध्ये हिंदुस्थानचा पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाम बांगलादेशचा भाग म्हणून दाखवण्यात आला आहे. ते म्हणाले की बांगलादेश अजूनही मुक्तीच्या शोधात आहे आणि ही फक्त सुरुवात आहे. मात्र, हिंदुस्थान काबीज करण्याचे स्वप्न शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी शांतपणे पोस्ट हटवली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List