Sanjay Shirsat : हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तारावरून राजकारण तापलं; खाते वाटपावर काय म्हणाले संजय शिरसाट?
राज्यात महायुतीने बहुमताची लाट आणली. या लाटेत महाविकास आघाडी कुठल्या कुठे वाहून गेली. पण महायुतीला सत्ता स्थापन्याला बराच मुहूर्त लागला. 10 दिवसांनी महायुतीची सत्ता राज्यात आली. देवेंद्र फ़डणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात मंत्री पदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू आहे. चर्चाच नाही तर अनेक ठिकाणी मोठं-मोठाली बॅनर, पोस्टर्स लागली आहेत. पण खरा पेच हा गृह खात्याचा आहे. मंत्रिमंडळ विस्तारावेळी गृह खात्याचा ट्विस्ट येणार असल्याचा दावा अनेकजण करत आहे.
आता विस्तार करावाच लागेल
राज्यमंत्री मंडळाची यादी दिलीत गेली की नाही याबद्दल कल्पना नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आता विस्तार हा करावाच लागेल, असे वक्तव्य शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी केल आहे. नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी या विस्तार होणार अशी माहिती आहे आणि दोन ते तीन दिवसांमध्ये विस्तार होईल असं समजत आहे, असा खुलासा त्यांनी केला आहे.
खाते वाटपाची चर्चा तर होणारच
खाते वाटप हा महायुतीमधील कळीचा मुद्दा ठरणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे ते गृहखात्यासाठी अजूनही आग्रही असल्याची चर्चा आहे. यावर सुद्धा संजय शिरसाट यांनी संकेत दिले आहेत. मंत्रिमंडळाबाबत कुठलाही घोडा अडलेला नाही, बरीच मोठी प्रोसिजर, प्रक्रिया आहे, असे ते म्हणाले. कुणाला कुठलं खातं द्यायचं, याबद्दल चर्चा तर करावीच लागणार असे सांगत त्यांनी पत्ता उघड केला. महायुतीला मोठे यश मिळाल्याने मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या पण अधिक असल्याचे त्यांनी सांगीतले.
दिल्लीतील बैठक राहुल गांधींविरोधात
दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या घरी जी बैठक होते ती ईव्हीएम बाबत होत नाहीये तर ती राहुल गांधी यांचे नेतृत्व बदलण्यासाठीची बैठक असल्याचा दावा शिरसाट यांनी केला. राहुल गांधीवर अविश्वास दाखवण्यात येत आहे. राज्यात जे काही घडलं, लोकसभेत जो काही पराभव झाला यानंतर इंडिया आघाडीला एक नव्या नेतृत्वाची गरज आहे आणि ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व सोपवलं जाईल असं वाटतंय, असे ते म्हणाले. ईव्हीएम बाबत प्रश्न उपस्थित करून विरोधकांना काही मिळणार नाहीये केवळ त्यांच्या वेळ जाणार आहे असा टोला त्यांनी हाणला.
अनेकजण अजितदादांकडे येणार
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवला आता संजय राऊत शरद पवार यांना पक्ष संपवण्यासाठी कदाचित शरद पवार यांची भेट घेतील आणि हिंदुत्व बद्दल बोलण्याचा संजय राऊत यांना कुठलाच नैतिक अधिकार नाही, असा सणसणीत टोला त्यांनी हाणला.
जयंत पाटील हे महायुतीमध्ये येऊ शकतात हे भाषण आम्ही सहा महिन्यापूर्वीच केलं होतं , विधानसभा निकालानंतर शरद पवार यांच्या पक्षातले बरेचसे आमदार राष्ट्रवादी सोडून अजित दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मर्ज होण्यासाठी इच्छुक असल्याचे सध्या दिसते आणि ते लवकरच होईल असं वाटत आहे, असे शिरसाट म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List