मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी इतके दिवस बंद, कारण…
Mumbai Siddhivinayak Mandir: मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत असतात. मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून भाविक गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी नेहमी रांगा लागलेल्या असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पदाची शपथ घेण्यापूर्वी सिद्धिविनायक मंदिरात जावून दर्शन घेतले होते. भाविकांना पावणारा गणराया म्हणून सिद्धिविनायक मंदिराची ख्याती आहे. आता पाच दिवस मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.
का राहणार मंदिर बंद
माघी गणेशोत्सवाच्या तयारीकरिता मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन आजपासून पुढील ५ दिवस बंद राहणार आहे. सिद्धिविनायक बाप्पाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे मूळ सिद्धिविनायक बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन भाविकांना ११ डिसेंबर ते १६ डिसेंबरपर्यंत घेता येणार नाही. त्यामुळे मूळ मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना १७ डिसेंबरनंतरच मंदिरात यावे लागणार आहे. परंतु मंदिर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे.
ही आहे पर्यायी व्यवस्था
मंदिर प्रशासनाकडून मूळ मूर्तीच्या समोर प्रतिकृती तयारी करण्यात आली आहे. त्या प्रतिकृतीचे दर्शन पुढील पाच दिवस भाविक घेऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. माघी गणेशोत्सव हा पुढील वर्षी १ फेब्रुवारीला होणार आहे. त्याची तयारी सध्या मंदिर प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
19 नोव्हेंबर 1801 रोजी सिद्धिविनायक बांधले होते. आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील यांनी हे मंदिर बांधले. या ठिकाणी भाविकांकडून भरभरुन दान दिले जाते. त्यामुळे भारतातील श्रीमंत मंदिरांमध्ये या मंदिराचाही समावेश होतो. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सिद्धिविनायक मंदिर एका लहान मंदिरापासून आजच्या भव्य मंदिरात विकसित झाले.
सिद्धिविनायक मंदिरात गर्भगृहाच्या लाकडी दरवाजांवर अष्टविनायकाची आठ रूपे कोरलेली आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या आतील छतावर सोन्याचा मुलामा चढलेला आहे. त्याच्या मध्यवर्ती भागात गणरायाची मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरात हनुमानाचे मंदिरही आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List