जायचेच होते मग येऊ नका… भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर सोनू निगम संतापला
राजस्थान ग्लोबल इन्वेस्टमेंट समिटचा पहिलाच दिवस चर्चेत आला आहे. कार्यक्रमाची सुरुवात जरी दणक्यात झाली असली तरी या कार्यक्रमात गायक सोनू निगम याला वाईट अनुभव आला आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या कार्यक्रमाला राजस्थानच्या मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि अनेक राजकारण्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी सोनू निगम परफॉर्म करत असताना असे काही घडले ज्यामुळे सोनू निगम संतापला झाला. आता सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून त्याने राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय त्यांना सल्लाही दिला आहे.
राजस्थान ग्लोबल इन्वेस्टमेण्ट समिटमध्ये सोनू निगम याने आपल्या गायनाने माहोल तयार केला होता. कार्यक्रम रंगात आला असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह, नेतेमंडळी कार्यक्रमादरम्यान मध्येच उठून गेले. त्यांच्या या कृतीने गायक सोनू निगम प्रचंड नाराज झाला आणि सोशल मीडियावर त्याने आपला राग व्यक्त केला. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, त्यात तो म्हणाला की, मी जयपूरमध्ये सुरू असलेल्या रायजिंग राजस्थान शो मधून परतलो आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेतेमंडळींनी उपस्थिती लावली होती. मात्र माझा गायनाचा कार्यक्रम सुरू असताना राजस्थानचे मुख्यमंत्री आणि नेतेमंडळी तिथून उठून निघून गेले.
सोनू निगम पुढे म्हणाला की, माझे सर्व नेत्यांना निवेदन आहे की, त्यांनी असे वागू नये. मी कधीच शो दरम्यान मुख्य अतिथी असे उठून गेल्याचे पाहिले नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्हाला कार्यक्रम सोडून जायचे असेल तर येऊच नका किंवा तो कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच निघून जा. कोणत्याही कलाकाराचा शो असा मध्येच सोडून जाणे योग्य नाही. याने कलाकारासह आणि सरस्वतीचा अपमान होतो. तो पुढे म्हणाला की, मला अनेकांचे मेसेज आले की, जिथे कलाकारांचा सन्मान नाही तिथे तुम्ही असे शो करायलाच नको. मला माहित आहे तुम्ही प्रचंड व्यस्त असता. पण कलेचा सन्मान तुम्ही नाही करणार तर कोण करणार? म्हणून तुम्हाला नम्रतेने विनंती करतो की, तुम्ही शो सुरू होण्यापूर्वीच जा असे म्हणाला आहे. सध्या सोनू निगमचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून चर्चेत आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List