‘कुणबी’साठी अडवणूक; एजंटांकडून येणाऱ्या प्रकरणावर त्वरित सह्या, युवासेनेकडून धरणे आंदोलनाचा इशारा
मराठा कुणबी प्रकरणासाठी सर्वसामन्यांची अडवणूक होत असून, एजंटकडून येणाऱ्या प्रकरणांवर डोळे झाकून सह्या करणारे अव्वल कारकून तसेच नायब तहसीलदार सर्वसामन्यांची अडवणूक करत असल्याचा गंभीर आरोप युवासेनेने केला आहे.
तहसील तसेच प्रांत कार्यालयातील ऑनलाइन ऑपरेटर, अधिकारी व एजंटच्या मिलीभगतचा हा प्रकार थांबला नाही तर पुढील आठवड्यात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा युवासेना तालुका युवाअधिकारी शंभूराजे फरतडे यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आजपर्यंत मराठा कुणबी प्रकरणासाठी अत्यंत गतिमान व पारदर्शक यंत्रणा राबवून अनेकांना कुणबी दाखले मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. मात्र, निवडणुकीपासून कुणबी मराठा प्रकरणाचा निपटारा अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. एजंटकडूनच प्रकरणे यावीत यासाठी ऑनलाइन ऑपरेटर व प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची इच्छा असल्याने अनेक प्रकरणे दोन ते तीन महिन्यांपासून धूळखात पडलेली आहेत. प्रांत व तहसील कार्यालयातील ऑनलाइन ऑपरेटर तसेच प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची मिलीभगत असून, एजंटकडून आलेली प्रकरणे तत्काळ तहसील व प्रांत यांच्यासमोर ठेवली जातात. मात्र, नागरिकांनी दिलेली तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून येणारी प्रकरणे अडकवून ठेवणे, किरकोळ कारणे देऊन माघारी पाठवणे, असे प्रकार सुरू आहेत.
कुणबी प्रकरणासाठी एजंटकडून अनेकांची लूट झाली आहे. याबाबत करमाळा येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी दाखल झालेल्या आहेत. मात्र, तरीदेखील तहसील व प्रांत कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट सुरू असून, तहसील व प्रांतमधील ऑनलाइन ऑपरेटर व एजंटांमध्ये मिलीभगत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक होत आहे.
– शंभूराजे फरतडे, युवासेना, तालुका युवा अधिकारी
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List