चिंताजनक… दोन वर्षांत ‘बेस्ट’च्या धडकेत 62 जणांचा मृत्यू, एकूण 247 अपघात
रेल्वेनंतर मुंबईची दुसरी ‘लाइफलाइन’ असलेल्या ‘बेस्ट’च्या अपघातात गेल्या दोन वर्षांत तब्बल 62 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 2022-23 पासून आतापर्यंत बेस्टचे एकूण 247 अपघात झाले असून यामध्ये 143 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पादचारी, प्रवासी आणि रस्त्यावर चालणारे नागरिक, वाहनचालकांचा समावेश आहे. या आकडेवारीमुळे बेस्टचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि पादचाऱ्यांचीही काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा मुंबईकरांमधून व्यक्त होत आहे.
सर्वसामान्य मुंबईकरांच्या प्रवासाचे बेस्ट हे महत्त्वाचे साधन आहे. दररोज मुंबईत 35 लाख प्रवासी बेस्टने प्रवास करतात. सुरक्षित प्रवासासाठी बेस्ट बसला प्रवासी पसंती देतात. परंतु हीच दुसरी लाइफलाइन प्रवासी व पादचाऱयांसाठी जीवघेणी ठरत असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. दादर टीटी खोदादाद सर्कल येथे बेस्ट उपक्रमाच्या तेजस्वीनी बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या डंपरला मागून धडक दिल्याची घटना 2 नोव्हेंबर 2021 रोजी घडली होती. या दुर्घटनेत गंभीर जखमी चालकासह तीन जणांचा मृत्यू तर आठ जखमी झाले होते. तर भांडुप येथे 11 ऑगस्ट 2021 रोजी बेस्ट बस इलेक्ट्रिक केबिनवर धडकली होती. या दुर्घटनेत वृद्धाचा मृत्यू तर दोन जखमी झाले होते. 22 जून 2023 रोजी गिरगाव येथे बेस्ट बसला झालेल्या अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशा प्रकारे ठरावीक कालावधीनंतर घडणाऱया अपघातांना पादचारी, प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या दोन वर्षांत बेस्ट बसेसच्या 158 अपघातांत 41 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 141 जण जखमी झाले आहे.
अपघात टाळण्यासाठी ट्रेनिंगचा कालावधी वाढवणार
‘बेस्ट’च्या ताफ्यात स्वतःच्या एक हजार तर भाडेतत्त्वावरील 2200 गाडय़ा आहेत. या बसवर ड्रायव्हिंग करताना दहा दिवसांचे ट्रेनिंग देण्यात येते. अपघात टाळण्यासाठी हे ट्रेनिंग वाढवण्याची गरज आहे का, याबाबत पुनर्विचार करून आवश्यकता असल्यास प्रशिक्षण काळ वाढवण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी ड्रायव्हरना सौजन्य, मानसिक स्थैर्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अशी होते अपघातानंतर कार्यवाही
- बेस्टच्या ताफ्यात सध्या एकूण 7212 बसचालक तर 7423 बसवाहक आहेत. तर 6563 कंत्राटी बसचालक तर 2340 पंत्राटी बसवाहक आहेत. यामध्ये कंत्राटी बसच्या अपघातास कंत्राटदार तर बेस्टच्या स्वमालकीच्या गाडीचा अपघात झाल्यास बेस्ट प्रशासन पादचारी- प्रवाशाचा मृत्यूला जबाबदार असते.
- ‘बेस्ट’ अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तातडीने बस आगारातून बस निरीक्षक, अपघात निरीक्षक यांना घटनास्थळी त्वरित जखमींची मदत करण्यासाठी पाठवण्यात येते. जखमींची परिस्थिती गंभीर असल्यास जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात येते. मृतांना दाव्यानुसार ‘बेस्ट’कडून आर्थिक नुकसानभरपाईदेखील दिली जाते.
असे झाले अपघात
- भाडेतत्त्वावरील गाडय़ांचे वर्ष 2022 ते 2023 आणि 2023-24 वर्षापासून आतापर्यंत 114 अपघात झाले आहेत. यामध्ये 40 जीवघेणे तर 60 गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत.
- तर ‘बेस्ट’च्या स्वतःच्या ताफ्यातील गाडय़ांचे वर्ष 2022 ते 2023 आणि 2023-24 वर्षापासून आतापर्यंत 133 अपघात झाले असून 22 जीवघेणे तर 83 गंभीर स्वरूपाचे आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List