‘दिल तू, जान तू…’; कतरिना कैफकडून विकीवर प्रेमाचा वर्षाव
अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त कतरिनाने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट केला आहे. सोमवारी कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विकीसोबतचा सेल्फी पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘दिल तू, जान तू..’ असं लिहित तिने हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. हा फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफने 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा याठिकाणी धूमधडाक्यात लग्न केलं होतं. लग्नापूर्वी दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र लग्नापर्यंत त्यांनी आपलं नातं मीडियापासून लपवून ठेवलं होतं. विकी आणि कतरिनाच्या लग्नाला फक्त 120 पाहुणे उपस्थित होते.
एका मुलाखतीत कतरिनाने सांगितलं होतं की तिने 2018 मध्ये ‘मनमर्जिया’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पहिल्यांदा विकीला पाहिलं होतं. त्यावेळी विकी बॉलिवूडमध्ये आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत होता. ‘मसान’ आणि ‘रमन राघव 2.0’ यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. त्याशिवाय ‘राजी’, ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘संजू’मधील भूमिकांनाही प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळालं होतं. जेव्हा कतरिनाने विकीला ट्रेलरमध्ये पाहिलं, तेव्हा त्याचं अभिनयकौशल्य आणि प्रतिभा पाहून ती खूप प्रभावित झाली होती. दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी कतरिनाला ‘मनमर्जिया’चा ट्रेलर दाखवला होता, तेव्हा तिने त्यांना विकीविषयी विचारलं होतं.
दिग्दर्शक झोया अख्तरच्या पार्टीमध्ये विकी आणि कतरिनाची पहिल्यांदा समोरासमोर भेट झाली होती. त्यावेळी दोघांच्याही मनात एकमेकांविषयी विशेष काही भावना नव्हत्या. मात्र दोघांमध्ये हळूहळू मैत्री झाली आणि त्याचं प्रेमात रुपांतर झालं. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये कतरिनाने सांगितलं की “आमचं भेटणं जणू लिहिलेलंच होतं. आमचं एकत्र येणं जणू आधीच ठरलेलं होतं. कारण आमच्या दोघांमध्ये इतके योगायोग जुळून आले की एका टप्प्यानंतर मला सर्वकाही स्वप्नवत वाटू लागलं होतं.” कतरिना आणि विकी यांच्या वयात पाच वर्षांचं अंतर आहे. कतरिना ही विकीपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. मात्र ही जोडी नेहमीच चाहत्यांच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक ठरली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List