सोनाक्षीच्या लग्नात दोघंही भाऊ का उपस्थित नव्हते? अखेर शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं सत्य
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचं आंतरधर्मीय लग्न यंदाच्या वर्षी प्रचंड चर्चेत होतं. जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर यावर्षी जून महिन्यात सोनाक्षी आणि झहीरने लग्न केलं. झहीरसोबत सोनाक्षीच्या आंतरधर्मीय लग्नाला तिच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याच्या बऱ्याच चर्चा होत्या. खासकरून सोनाक्षीचे दोघं भाऊ लव आणि कुश या लग्नाच्या विरोधात असल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नव्हे तर याचमुळे दोघं बहिणीच्या लग्नालाही अनुपस्थित होते. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नात फक्त तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा दिसले. यावर आता पाच महिन्यांनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी मौन सोडलं आहे. या लग्नाबाबत आणि मुलांच्या विरोधाबाबत त्यांनी त्यांचा दृष्टीकोन मांडला. त्याचसोबत मुलं या लग्नाच्या विरोधात का होते, याचंही उत्तर त्यांनी दिलं.
‘रेट्रो लेहरे’ला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. “मुलीच्या आंतरधर्मीय लग्नाच्या निर्णयाला तुमचा पाठिंबा होता का”, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “अर्थात, मी माझ्या मुलीची साथ देईन. तिला साथ न देण्याचं काही कारणच नाही. हे त्यांचं आयुष्य आहे आणि त्यांचं लग्न आहे. त्यांनाच त्यांचं आयुष्य जगायचं आहे. जर त्यांना एकमेकांबद्दल खात्री असेल तर आपण विरोध करणारे कोण? एक पालक म्हणून आणि एक पिता म्हणून तिची साथ देणं हे माझं कर्तव्य होतं. मी नेहमीच तिच्या पाठिशी उभा राहिलो आणि यापुढेही राहीन. आपण महिला सक्षमीकरणाबद्दल इतकं बोलतो, मग तिने आपला जोडीदार निवडणं चुकीचं कसं ठरतं? त्यात तिने काही बेकायदेशीर केलेलं नाही. ती समजूतदार आहे.”
मुलीच्या लग्नाबद्दल आनंद व्यक्त करत ते पुढे म्हणाले, “मी तिच्या लग्नाच्या पार्ट्यांचा खूप आनंद घेतला. लोकांना भेटून मी खुश होतो. सोनाक्षी आणि झहीर एकत्र खूप चांगले दिसतात. लग्नाचा तो माहौल खूपच छान होता.” यावेळी सोनाक्षीच्या लग्नाला मुलांच्या अनुपस्थितीबाबतही त्यांनी मनमोकळी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या वेदना आणि मनातील संभ्रम मी समजू शकतो, असं ते म्हणाले.
“मी तक्रार करणार नाही. तेसुद्धा मानवच आहेत. कदाचित ते आता तितके समजूतदार झाले नसावेत. पण मी त्यांच्या वेदना आणि मनातील संभ्रम समजू शकतो. सांस्कृतिक प्रतिक्रिया नेहमीच असते. कदाचित मी त्यांचा वयाचा असतो तर माझीही प्रतिक्रिया तशीच असती. पण इथे तुमचा समजूतदारपणा, ज्येष्ठता आणि अनुभव कामी येतो. त्यामुळे माझ्या मुलांइतकी टोकाची प्रतिक्रिया माझी नव्हती”, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केलं.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून रोजी लग्न केलं. मुंबईतील राहत्या घरीच या दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न करून त्यानंतर जंगी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. नंतर सोनाक्षीचा भाऊ कुशने तिच्या लग्नाला उपस्थित असल्याचं स्पष्ट करत ‘कुटुंबीयांसाठी ही खूप संवेदनशील वेळ आहे’ अशी प्रतिक्रिया दिली होती. तर लवने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित नाराजी व्यक्त केली होती. ‘मी या लग्नाला उपस्थित का राहिलो नाही, यामागचं कारण फार स्पष्ट होतं. मला काही लोकांशी संबंध जोडायचे नाहीत. पीआर टीमकडून आलेल्या कथा न छापता मीडियाच्या काही सदस्यांनी त्यांचा रिसर्ज केल्याचं पाहून मला समाधान मिळालं’, असं त्याने लिहिलं होतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List