सीरियातील 50 वर्षांची हुकूमशाही उलथवली, बंडखोरांच्या हाती सत्ता; नागरिकांचा जल्लोष

सीरियातील 50 वर्षांची हुकूमशाही उलथवली, बंडखोरांच्या हाती सत्ता; नागरिकांचा जल्लोष

सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांनी अखेर देशातून पळ काढला असून सीरियाची सत्ता बंडखोरांच्या हाती गेली आहे. ते देश सोडून पळून जाण्यापूर्वी लष्कराकडून त्यांना सुखरूप त्यांच्या कार्यालयातून बाहेर काढतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर त्यांनी देशाबाहेर पलायन केल्याचा दावा लष्करानेच केला आहे. गेल्या 11 दिवसांपासून बंडखोर आणि लष्कर यांच्यात सीरियाची सत्ता ताब्यात घेण्यासाठी संघर्ष सुरू होता. दरम्यान, असद कुटुंबाची तब्बल 50 वर्षांची हुकमत संपुष्टात आली आहे. बंडखोरांनी सीरियाचे दिवंगत राष्ट्रपती हाफीज असद यांचा पुतळा तोडून टाकला असून लोकांनी मशिदींबाहेर गर्दी करून बशर असद यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

बंडखोरांनी आज सकाळी सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर असद यांनी देश सोडल्यानंतर सीरियाच्या पंतप्रधानांनी बंडखोरांच्या हाती सत्ता सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला. पंतप्रधान मोहम्मद गाझी अल जलाली यांनी एक ध्वनिफीत प्रसिद्ध करून ते देशातच राहतील आणि सीरियातील लोक ज्याला निवडतील त्यांच्यासोबत काम करतील, असे म्हटले आहे. सीरियातील प्रादेशिक वृत्तवाहिन्यांवरून व्हिडीओ दाखवले जात होते. त्यात एक समूह राष्ट्रपती बसर अशद यांना सत्तेतून बाहेर फेकण्यात आले असून विविध ठिकाणी तुरुंगात बंद असलेल्या कैद्यांना सोडण्यात आल्याचा दावा केला. व्हिडीओत ‘ऑपरेशन रूम टू कॉन्कर दमास्कस’ या समूहाचा म्होरक्या एक निवेदन वाचून दाखवताना दिसत आहे. दरम्यान, सीरियातील सर्व हिंदुस्थानी नागरिक सुरक्षित असल्याचे हिंदुस्थान सरकारने स्पष्ट केले आहे.

मसाना सीमेवर सीरियन नागरिकांची गर्दी

बशर असद देश सोडून गेल्याचे वृत्त कळताच पुन्हा सीरियामध्ये दाखल होण्यासाठी मसाना सीमेवर मोठ्या प्रमाणावर सीरियन नागरिकांची गर्दी झाल्याचे चित्र होते. 30 सप्टेंबरपासून आतापर्यंत लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांच्या संस्थेमध्ये 7 लाख 68 हजार 535 विस्थापित सीरियन नागरिकांची नोंद झाल्याचे लेबनॉनने स्पष्ट केले आहे.

मशिदींमध्ये प्रार्थना, आनंदोत्सव साजरा

दमास्कमध्ये रस्तोरस्ती नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. शहरातील मशिदींमध्ये गर्दी करून नागरिकांनी प्रार्थना केली. देव महान आहे असे म्हणत बशर असद यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाहनांचे हॉर्न वाजवून लष्कराच्या टँकरवर चढून तसेच खासगी वाहनांवर उभे राहून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, सुरक्षा दलांच्या जवानांनी फेकून दिलेली शस्त्रे तरुणांनी हाती घेऊन हवेत गोळीबार करतानाचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत.

14 वर्षांच्या गृहयुद्धात हजारो नागरिकांचा बळी

बंडखोरांनी 6 डिसेंबर रोजी ताब्यात घेतलेल्या दारा शहरातून राजधानी दमास्कसमध्ये प्रवेश केला. दारा याच शहरात 2011 मध्ये राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्याविरोधात बंडखोरी सुरू झाली आणि देशभरात गृहयुद्ध सुरू झाले. या युद्धात हजारो नागरिकांचा बळी गेला. अलेप्पो, हमा आणि होम्स इस्लामिक दहशतवादी गट हयात तहरीर अल-शामच्या ताब्यात आहेत. संघर्षामुळे आतापर्यंत 3.70 लाख लोक विस्थापित झाले आहेत.

बंडखोरांचा नेता अल जुलानी कोण आहे?

हयात तहरीर अल शाम या इस्लामी कट्टरपंथी बंडखोर गटाच्या हाती सीरियाची सत्ता गेली आहे. अबू मोहम्मद-अल जुलानी हा या गटाचा म्होरक्या आहे. त्याच्यावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप असून अमेरिकेने त्याला पकडून देणाऱ्याला एक कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. अबू मोहम्मद अल जुलानी हे एक टोपण नाव असून त्याचे खरे नाव काय आणि वय काय याबाबत वाद आहेत.

जुलानीने अमेरिकेतील ‘पीबीएस’ला दिलेल्या मुलाखतीत जन्माच्या वेळी त्याचे नाव अहमद अल शारा होते आणि तो मूळचा सीरियाचा असल्याचे म्हटले आहे. त्याचा जन्म सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे झाला होता. त्याचे वडील रियाध येथे काम करत होते. त्यानंतर जुलानी सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये लहानाचा मोठा झाला, तिथेच शिक्षणही झाल्याचे त्याने सांगितले होते.

2003 मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला केला. त्यावेळी तो अल कायदा या दशतवादी संघटनेशी जोडला गेला. 2006 मध्ये जुलानीला पाच वर्षांचा कारावास झाला. तेथून सुटका झाल्यानंतर अबू जुलानी सीरियात आला. त्यानतंर अल कायद्याशी संबंधित अल नुसरा फ्रंट ही कट्टरपंथी संघटना सुरू केली. त्याने अल बगदादीबरोबरही काम केले. 2013 मध्ये बगदादीने अल कायदासोबत संबंध तोडल्याचे जाहीर केले, परंतु जुलानी अल कायदासोबत काम करत राहिला. 2017 मध्ये त्याच्या गटाने सीरियातील इतर बंडखोरांच्या गटांना आपल्यासोबत घेतले आणि हयात तहरीर अल शाम असे नाव या संघटनेला दिले. अल जुलानी हा या संघटनेचा म्होरक्या आहे.

असद यांचा मृत्यू झाल्याचा संशय

बशर अल-असद रशिया किंवा तेहरानला जाणार असल्याची चर्चा आहे. सीरिया सोडल्यानंतर त्यांचे विमानच रडारवरून बेपत्ता आहे. त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचे विमान कोसळून त्यांचा मृत्यू झाला की त्यांनी अन्य कुठल्या देशात आश्रय घेतला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बीड, परभणी घटनेत मराठा क्रांती मोर्चाची उडी, राज्यस्तरीय बैठकीत घेतला मोठा निर्णय बीड, परभणी घटनेत मराठा क्रांती मोर्चाची उडी, राज्यस्तरीय बैठकीत घेतला मोठा निर्णय
Maratha Kranti Morcha: बीड आणि परभणी घटनेचे पडसाद राज्यभर नाही तर देशभर उमटत आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात अनेक पावले उचलली...
भुजबळ फडणवीसांना का भेटले? भाजपच्या बड्या नेत्याकडून पहिली प्रतिक्रिया समोर
अल्लू अर्जुनकडे आहेत ‘या’ 5 महागड्या गोष्टी; किंमत ऐकून विश्वास बसणार नाही
चिंता वाढली… भरपूर सूर्यप्रकाश असूनही व्हिटॅमिन डीची कमी, कारणे काय?; उपाय काय?
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
हिवाळ्यात दररोज किती बदामाचे करावे सेवन? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
महिनाभरात सेवा सुधारा अन्यथा 26 जानेवारीला “टॉवरवरून” आंदोलन, युवासेनेचा BSNL ला इशारा