आलिशान, प्रशस्त घरांना मुंबईकरांची पसंती; दोन ते पाच कोटी किमतीच्या फ्लॅट्सच्या विक्रीत वाढ
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आलिशान आणि प्रशस्त घरांच्या खरेदीकडे मुंबईकरांचा ओढा असल्याचे दिसतेय. 2024 या वर्षात आतापर्यंत मुंबईत 1 लाख 28 हजार घरांची विक्री झाली असून यापैकी एक लाख एक हजार घरांच्या किमती दोन ते पाच कोटींच्या दरम्यान आहेत. आर्थिक स्थैर्य, जीवनशैलीतील बदल आणि प्रशस्त घरांची मागणी यामुळे मुंबईतील घर खरेदीदारांना मोठय़ा अपार्टमेंट्समध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
मुंबईतील घर खरेदीदारांचा कल मोठ्या आणि प्रशस्त घरांकडे असल्याचा निष्कर्ष ‘नाईट फ्रँक’ पंपनीच्या अभ्यासातून समोर आला आहे. दोन ते तीन बीएचके फ्लॅट घेण्याकडे मुंबईकरांचा ओढा आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये एक हजार ते दोन हजार चौरस फुटांच्या घरांचा वाटा आठ टक्क्यांवरुन 14 टक्क्यांपर्यंत वाढला, तर दोन हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आकाराच्या घरांचा वाटा दोन टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत वाढला. याउलट 500 चौरस फुटांपर्यंतच्या लहान युनिट्समध्ये मोठी घट झाली असून त्यांच्या नोंदणीचा वाटा 47 टक्क्यांवरून 33 टक्क्यांपर्यंत घसरला आहे, मात्र 500 ते एक हजार चौरस फुटांचे घर अजूनही खरेदीदारांमध्ये लोकप्रिय असून सर्व नोंदणीकृत व्यवहारांपैकी 48 टक्के वाटा त्यांचा आहे.
पश्चिम उपनगरात मालमत्ता खरेदीची संख्या उच्चांकी असून मध्य आणि दक्षिण मुंबईतही मागणी झपाटय़ाने वाढतेय. घर खरेदीदारांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे नोव्हेंबर 2024 मध्ये मध्य उपनगरातील नोंदणीकृत मालमत्तांची संख्या गतवर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत 29 टक्क्यांवरून 31 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. दक्षिण मुंबईत ही संख्या सात टक्क्यांवरून नऊ टक्क्यांवर पोहोचली.
नोव्हेंबरमध्ये 10,216 घरांची विक्री झाली
‘नाइट फ्रँक इंडिया’च्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये मुंबईतील मालमत्ता नोंदणीमध्ये पाच टक्के वाढ झाली असून 10,216 घरांच्या खरेदी-विक्रीची नोंद झाली आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात 9736 घरांची खरेदी-विक्री झाली होती. गतवर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत यंदा मुद्रांक शुल्क संकलनात 30 टक्के वाढ झाली असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List