साहेबांची शेवटची निवडणूक आहे, असं कुठला दुश्मन म्हणतोय! सुप्रिया सुळे खवळल्या
लोकसभेला शेवटची निवडणूक होती. आताही शेवटची निवडणूक असल्याचे काहीजण सांगतात. पण पोरासारखा पुतण्या सोडला आणि थेट नातवाकडे लक्ष, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे.
साहेबांची शेवटची निवडणूक आहे, असं कुठला दुश्मन म्हणतोय. असं कधीच कुणाबद्दल बोलत नाहीत. तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार, असं आम्ही म्हणतो. पण असं वक्तव्य असेल तर ते धक्कादायक आहे. एकतर पवारसाहेब इमोशन असल्याचं कधीच दाखवत नाही. कुठल्याही नेत्याला इमोशन दाखवायचा अधिकारच नसतो. गेल्या सहा दशकांच्या राजकारणात शरद पवारांनी कधीही इमोशन्स वैगरे या गोष्टी केल्या नाहीत. त्यांनी कर्तृत्वावर, कष्टाने आणि विकासावरच मतं मागितली आहेत. मात्र, (अजित पवार यांचं वक्तव्य) मी हे स्टेटमेंट ऐकलेलं नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजित पवार म्हणाले मी पवारसाहेबांच्या मुलासारखा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना केला. हो अर्थात आहेच ना, आम्ही कधी नाही म्हटलं, असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.
पवारसाहेबांचं अयुष्य किंवा कुठल्याही व्यक्तीचं, विरोधक असला म्हणून काय झालं. मलाही वाटतं मोदीजी सौ साल नही, दो सौ साल जिये. विरोधक असला म्हणून काय झालं. त्याचं हे शेवटचं इलेक्शन आहे, असे आमचे संस्कार नाही हो. प्रत्येकाचं आयुष्य दीर्घ आणि आनंदी असावं, अशी आमची इच्छा आहे. आम्ही लढत राहू, त्यात काय आहे. पहिलं आणि शेवटचं इलेक्शन असल्या गोष्टी कधी आम्ही बोलतही नाही. कुणाहीबद्दल आम्ही कधी बोलणारही नाही. दुर्दैवं आहे, जर त्यांनी अशी भाषा वापरली असेल तर, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List