मतदारराजा ‘नरकासुराला’ जागा दाखवेल, मतपेटीतून नरसिंह बाहेर पडेल आणि महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण करेल! – संजय राऊत
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात नरकासुराचा वध झालेला. तरीही कुठे नरकासूर वळवळत असेल तर या राज्याचा मतदारराजा त्या वळवळणाऱ्या नरकासुराला त्याची जागा दाखवेल, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते माध्यमांशी बोलत होते.
आज दिवाळीचा सण असून जनतेला स्वाभिमानाचे, सुखाचे दिवस यावेत यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न राहतील. वातावरण अत्यंत पोषक असून कुणी काहीही म्हणत असले तरी पुढल्या दिवाळीला या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असेल आणि जनतेच्या जीवनात आनंद अधिक द्विगुणीत झालेला तुम्ही पहाल, असे राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे 26 नोव्हेंबर नंतर मुख्यमंत्री नसतील किंबहुना राजकारणातही नसतील. भारतीय जनता पक्षाचा जन्म कपट, कारस्थाने यातून झालेला आहे. आपल्या सहकाऱ्यांचे, मदत करणाऱ्यांचे गळे कापणे हे त्यांचे धोरण असते. मग शिवसेना असो नकली शिवसेना असो अजित पवार असो किंवा देशभरातील त्यांचे अन्य सरकारी असो. काही दिवसांनी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारही धारातीर्थी पडलेले दिसतील.
महायुतीचे सरकार येईल आणि मनसेच्या मदतीने भाजपचा मुख्यमंत्री होईल असे विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात केले. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांना मदत करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांचा अपमान करणे. मोदी, शहा, फडणवीस महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून ज्या प्रद्धतीचे राजकारण करताहेत ते महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या हिताचे नाही. तरीही मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या पक्षाचे प्रमुख फडणवीस यांना आम्ही मुख्यमंत्री करू असे म्हणत असतील तर हा कोणता दबाव आहे? ईडी, सीबीआय की आणखी कशाचा? असा सवाल राऊत यांनी केला.
एकेकाळी मोदी, शहांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देऊ नका. ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत असे राज ठाकरे म्हणत होते. आता असे काय झाले की गेल्या एक महिन्यात महाराष्ट्राचे शत्रू त्यांना तारणहार वाटू लागले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे हित सर्वात वर पाहिले आणि मग राजकारण केले. जे लोक महाराष्ट्रावर चाल करून येताहेत त्यांच्याशी हात मिळवणी करणे म्हणजे महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या 106 हुताम्यांचे हौतात्म्या लाथाडण्यासारखे आहे. राज्यातील जनता हे उघड्या डोळ्याने पहात असून प्रत्यक्ष मतपेटीतून नरसिंह बाहेर पडेल आणि महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करेल, असे राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List