अमित शाह ‘अभी बच्चा है’, इंदिरा गांधींवरील वक्तव्यावरुन मल्लिकार्जुन खरगेंचा पलटवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपकडून राष्ट्रीय मुद्दे उपस्थित करत जनतेचे लक्ष विचलीत करण्यात येत आहे. कलम 370, राम मंदिर, आरक्षणाची मर्यादा वाढवणे हे राष्ट्रीय मुद्दे आहेत. हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मांडण्यापेक्षा राज्यातील मूलभूत समस्या आणि सत्ताकाळात काय केले, यावर बोला असे आव्हान विरोधी पक्षांनी भाजपला दिले आहे. तरीही भाजपकडून कलम 370 चा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला होता. त्यावर आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पलटवार केला आहे.
इंदिरा गांधी परत आल्या तरी आता 370 कलम पुन्हा येणार नाही असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी जबरदस्त पलटवार केला आहे. अमित शाह इंदिरा गांधी यांच्यासमोर ‘अभी बच्चा है’ अशा शब्दात मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमित शाहा यांना टोला लगावला आहे.
भाजपचा वचननामा आणि ते देत असलेली आश्वासने म्हणजे जुमलेबाजी आहे, हे आता जनतेला समजले आहे. मात्र, आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करत आहोत. कर्नाटकात महालक्ष्मी योजना सुरु झाली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही ही योजना सुरू करत महिलांना महिन्याला 3000 रुपये दिले जाणार आहेत.बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेपर्यंत 4000 हजार रुपये महिना देणार आहोत.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान आपल्याला वाचवायचे आहे. संविधान आमच्या हातात असेल तर ते अर्बन नक्षलवाद्याचं प्रतीक आहे, असा आरोप करण्यात येतो. मात्र, ही लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे. विचारधारेची लढाई आहे. ते जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी द्व्ष पसरवत आहेत. मात्र, महाराष्ट्रमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे शेतमालाच्या हमीभावाचा. अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मोदी सरकारने अनेक कर लावले आहेत. जीएसटीमुळे सामान्य नागरिक महागाईने हारपळत आहे, अशा टीकाही खरगे यांनी केली.
मोदी परिवार म्हणजे मोदी यांचे दोनच मित्र आहेत, ते म्हणजे अदानी आणि अंबानी, असा टोलाही त्यांनी लगावला. देशातील 5 टक्के लोकांकडे 65 टक्के संपत्ती आहे. मोदी गरीबांचा, सर्वसामान्यांचा विचार कधीही करत नाहीत. त्यांचे धोरण उद्योगपतींच्या फायद्यासाठी असते, असेही ते म्हणाले. जुमलेबाजी करणारे मोदी खोट्या लोकांचे सरदार आहेत. खोटं बोलून मत मागू नका. आपल्या विचारधारा सांगा असे आव्हानही खरगे यांनी दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List