भाजपने दोन हजार कोटी रुपये खर्च करून महाविकास आघाडी सरकार पाडले; सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप
महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने मिंध्यांच्या 40 आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपये दिले, असे दोन हजार कोटी रुपये खर्च करून महाविकास आघाडी सरकार पाडल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केला. तसेच दोन पक्ष पह्डून आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिमानाने सांगत आहेत. दोन पक्ष पह्डल्याचा कसला अभिमान बाळगता, असा जळजळीत सवालही सुळे यांनी केला.
महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना खासदार सुळे पुढे म्हणाल्या, पुणे जिह्यातील रिंगरोडला आमचा विरोध नाही. रिंगरोडच्या कामाचा खर्च 18 हजार कोटी रुपये होता. त्यामध्ये 20 हजार कोटींची वाढ केली. त्यामुळे रिंगरोडचा खर्च 38 हजार कोटींवर गेला आहे. 20 हजार कोटी कोणाच्या घशात गेले, हे आम्हाला कळले पाहिजे. रिंगरोडमधील भ्रष्टाचार बाहेर काढला जाईल. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या कामाचा पंत्राटदार बदलण्यात येईल.
पक्षाचे निर्णय अजित पवारच घेत होते
अजित पवारांना नेते केले नसल्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याचा अमित शहा यांच्या आरोपाचा समाचार घेताना खासदार सुळे म्हणाल्या, ‘त्यांची 30 आणि माझी 18 वर्षे. दोघांना पक्षात काय मिळाले, याचा हिशेब करा. मी लोकसभेच्या उमेदवारीशिवाय पक्षाकडे काही मागितले नाही. पक्षाचे निर्णय कोण घ्यायचे, हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे अमित शहा यांच्या आरोपाला काही अर्थ नाही,’ असेही सुळे म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List