“150 खोल्यांच्या पतौडी पॅलेसमध्ये आईची ती एक गोष्टच नाही..”; सैफ अली खानचा खुलासा
अभिनेत्री शर्मिला टागोल या भारतीय सिनेसृष्टीतील अत्यंत दमदार कलाकार म्हणून ओळखल्या जातात. अभिनेत्रीसोबतच त्यांनी त्यांच्या आयुष्यात एक आई आणि पत्नीच्याही जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. शर्मिला यांनी त्यांच्या पतौडी पॅलेसची खूप चांगली देखभाल केली आहे. मात्र पतौडी पॅलेसमध्ये त्यांचा एकही फोटो नसल्याचा खुलासा मुलगा सैफ अली खानने केला आहे. ‘रेडिफ’ला दिलेल्या एका मुलाखतीत सैफ म्हणाला होता, “माझी आई कोणतीच गोष्ट फेकून देत नाही. त्यात काहीतरी जोडून, शिवून त्याला ती एक वेगळाच जन्म देते. एका शाही कुटुंबात लग्न केल्यानंतर आईने पतौडी पॅलेसचं जतन अत्यंत सुंदर पद्धतीने केलं आहे.”
“आमच्या पतौडी पॅलेसमध्ये आईचा एकही फोटो नाही. फक्त कॉरिडॉरमध्ये तिचा राष्ट्रीय पुरस्कार घेतानाचा एक फोटो आहे. पण तोसुद्धा पुस्तकांच्या कपाटात कुठेतरी ठेवला आहे. पण आईचं प्रभुत्व मात्र सगळीकडे आहे. गार्डनपासून पडद्यांपर्यंत सर्व गोष्टी तिने अत्यंत सुंदर पद्धतीने सजवल्या आहेत. त्यामुळे तिची उपस्थिती जाणवण्यासाठी फोटोची तशी गरजच नाही. एका अभिनेत्रीने घर आणि करिअर इतक्या चांगल्या पद्धतीने सांभाळणं फारच दुर्मिळ आहे. ती तिच्या स्टाफला प्रत्येक गोष्ट नीट समजावून सांगते”, असं सैफने पुढे सांगितलं.
याच मुलाखतीत सैफने सांगितलं की जेव्हा तैमुर, जेह आणि इनाया पतौडी पॅलेसमध्ये राहायला येतात, तेव्हा शर्मिला त्यांच्या नातवंडांसाठी बऱ्याच गोष्टींचं आयोजन आवर्जून करतात. “आम्ही पतौडीमध्ये राहायला जातो, तेव्हा ती तैमूरसाठी ट्रॅम्पोलिन जम्प्स तयार ठेवते. त्याला अशा भेटवस्तू देते, ज्यात मनोरंजन आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाप असतो”, असं तो म्हणाला. पतौडी पॅलेस हे सैफ अली खानचं वडिलोपार्जित घर हरियाणातील गुरुग्राममधील पतौडी शहरात आहे. हा शाही महाल 10 एकर जमिनीवर पसरलेला आहे. या महालात तब्बल 150 रुम्स असून त्याची किंमत जवळपास 800 कोटी रुपयांच्या घरात आहे. या पॅलेसमध्ये ‘वीर जारा’, ‘इट प्रे लव्ह’, ‘मंगल पांडे’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘तांडव’, ‘ॲनिमल’ यांसारख्या चित्रपटांचं शूटिंग झालं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List