रश्मी शुक्लांची ताबडतोब बदली करा; अद्वय हिरेंवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांची निवडणूक आयुक्तांकडे मागणी
मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर शिंदे गटाचे उमेदवार मंत्री दादा भुसे यांच्या तीन गुंडांनी गावठी कट्ट्यातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने खळबळ उडाली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची ताबडतोब बदली करावी आणि गुंडागर्दी, झुंडशाहीविरोधात कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी राऊत यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना केली.
अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसे यांच्या गुंडांनी हल्ला केला. त्यांच्याजवळ लोखंडी शिगा, तलवारी, गावठी कट्टे होते. हिरे यांना ठार मारण्याच्या उद्देशानेच हा हल्ला झाला. यात 5 शिवसैनिक जखमी झाले असून पोलिसांनी अजून कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. पोलीस यंत्रणेचा वापर करून अशा प्रकारे हल्ले होणार असतील तर त्यांना महाराष्ट्रात निवडणुका शांततेने करायच्या नाहीत हे दिसते. राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची निवडणुकीआधी बदली करावी अशी आमची मागणो होती. कारण पोलीस यंत्रणा एका पक्षाच्या राजकीय कामाला जुंपली आहे. त्यामुळे निवडणुका स्वच्छ वातावरणात होणार नाही हा आमचा अंदाज हळूहळू खरा ठरताना दिसतोय, असेही राऊत म्हणाले.
अद्वय हिरे सुदैवाने बचावले. त्यांच्यावर बंदुक रोखण्यात आली होती, पण कार्यकर्त्यांनी दादा भुसेंच्या मारेकऱ्याला खेचल्यामुळे ते बचावले. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची ही परिस्थिती असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस रोज कुठे ना कुठे जिपवर बसून मिरवणुकीत सामील झालेले दिसतात. तिकडे अमित शहा महाराष्ट्रात आम्ही कसे जिंकणार याचे अंदाज देताहेत. अशा पद्धतीने निवडणुका लढवल्या जाणार आहेत का? असा सवाल करत राऊत यांनी ज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची बदली करण्याची आणि गुंडागर्दी, झुंडशाहीविरोधात कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी राऊत यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना केली.
अद्वय हिरे यांच्यावर थेट हल्ला झाला. ज्या गुन्ह्यात ताबडतोब जामीन होऊ शकतो त्याखाली त्यांना 8 महिने तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात असतानाही त्यांच्यावर पक्ष सोडण्याचा दबाव होता. काल प्रचारफेरीत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. अनेक ठिकाणी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जुन्या केस काढून मोक्का लावू, ईडी पाठवू, गुन्हे दाखल करू अशा धमक्या दिल्या जात आहेत. पण आम्ही या धमक्यांना जुमानत नाही, असे राऊत म्हणाले.
मैत्रीपूर्ण लढत हा शाप; महाविकास आघाडीला ही लागण लावायची नाही! – संजय राऊत
सरन्यायाधीशांवर निशाणा
मोदींसोबत झालेल्या भेटीवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्टीकरण दिले. देशाच्या प्रमुखांसोबत राजकीय नाही तर न्यायपालिकेच्या प्रलंबित प्रश्नांबाबतही चर्चा होते, असे ते म्हणाले. याचा समाचार घेत राऊत म्हणाले की, आमदार अपात्रतेसंदर्भात त्यांच्या कारकिर्दीत निर्णय घेऊ शकले नाहीत. शिवसेना कुणाची, चिन्हा कुणाचे या संदर्भात फक्त तारखांवर ताखला देण्यात आल्या. असेच घडावे ही मोदी, शहांची इच्छा होती. आता ते निवृत्त होत असून आमच्या माहितीप्रमाणे आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांची वर्णी लावली जात आहे. ती काही सहज लावली जात नाही. त्याच्यामागे काहीतरी भेटीगाठी, निरोप, संदेश, देवाण घेवाण होतच असते. त्यासाठी महाराष्ट्राचा बळी दिला. दोन प्रमुख पक्ष ज्या पद्धतीने तोडले, त्याला मान्यता दिली. घटनेतील दहाव्या स्केड्यूलचा मुडदा सरन्यायाधीशांसमोर पडला आणि आमचे ऐकूनही घेतले नाही. घटनेचे, संविधानाचे रक्षण करणे, त्याविरोधात काम करत असेल त्याला रोखणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम असते. मात्र तुम्ही फक्त ताशेरे मारता, असे राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List