बिबवेवाडीतील भुखंड कर माफी प्रकरण – पुणे पालिकेच्या उपायुक्तांसह दोन निरिक्षकांना खुलासा द्यावा लागणार
पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून एका बांधकाम व्यावसायिकाच्या एक लाखाहून अधिक चौरस फूट मोकळ्या जागेचा कर माफ करण्याचा प्रताप उघडकीस आल्याप्रकरणी मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप आणि संबंधित दोन निरिक्षक यांना याप्रकरणी खुलासे सादर करण्याच्या नोटीसा देण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज.बी.पी. यांनी सांगितले. या प्रकारामुळे मिळकत कर विभागातील अधिकारी कर्मचार्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याची चर्चा पालिकेत आहे.
एका बांधकाम व्यावसायिकाची बिबवेवाडी परिसरात मोठी मोकळी जागा आहे. या जागेचे तीन हिस्से करून स्वतंत्र कर आकारणी करावी असा अर्ज संबंधित व्यावसायिकाने केला होता. यापैकी एक लाख चौ फूट जागा रस्त्यासाठी हस्तांतरित केल्याने 2021 पासून या जागेचा कर माफ करावा असे अर्जात नमूद केले होते. त्यानुसार मिळकत कर विभागाने प्रक्रिया सुरू करून तीन हिस्से दाखवून कार्यवाही केली. बिल काढण्यापूर्वी मिळकत कर विभागाच्या उपायुक्तांनी त्यावर स्वाक्षरी देखील केली. दरम्यान दोन हजार चौ. फूट क्षेत्रफळाच्या मिळकत करामध्ये कुठल्याही पद्धतीने बदल करायचा झाल्यास ते अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडे आहेत. उपायुक्तांच्या अधिकारात परस्पर एक लाख चौ. फुटाचे बदल करण्यात आले. या संदर्भातील निवेदनातही अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्या आहेत.
अतिरिक्त आयुक्तांचे अधिकार डावलून परस्पर चाललेल्या या प्रकाचे बिंग फुटल्याने मिळकत विभागातील सर्वांचीच तंतरली. तयार केलेले बिल डिलिट करून निवेदन आणि कव्हर पेज बदलून अतिरिक्त आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र, आधीच या प्रकरणाचे बिंग फुटल्याने अतिरिक्त आयुक्तांनी याची दखल घेत याप्रकरणी अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित निरीक्षकाला कारने दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले असताना उपायुक्तांनी त्याची बदली केली होती. मात्र, या सर्व प्रक्रियेवर विभागीय निरीक्षक, सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांच्या देखील स्वाक्षर्या झाल्या होत्या. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतरच बिल काढण्यात आले. निरीक्षकाने केलेली चूक पुढे तीन टप्प्यांवर सुधारण्याची संधी असताना त्याकडे डोळेझाक केली. यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी आता यातील सर्व संबंधितांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचा निर्णय घेतला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List