टाटा एअर बस प्रकल्पाचे उद्घाटन करून मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले, काँग्रेसचा हल्लाबोल
महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पळवलेल्या टाटा एअर बस प्रकल्पाचे गुजरातमध्येच उद्घाटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केला.
मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सचिन सावंत बोलत होते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, पण मागील दहा वर्षांपासून केंद्र सरकारसाठी एकमेव लाडके राज्य गुजरात आहे. मोदी-शहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला पळवले व त्याला शिंदे, फडणवीस या नेत्यांनी साथ दिली. शिंदे, फडणवीसांनी गुजरातसाठी काम करून महाराष्ट्राचे हित उद्ध्वस्त करण्याचे पातक केले आहे
टाटा एअर बस हा 1.8 लाख कोटींचा प्रकल्प होता. सेमी कंडक्टरचा 1.54 लाख कोटी रुपयांचा 1 लाख रोजगार देणारा उद्योगही पळवला. हिरे उद्योग गुजरातला घेऊन गेले, पण त्यात त्यांना यश आले नाही. नरेंद्र मोदींचा आदेश येताच राज्यातील नेते गुजरातसाठी काम करतात. राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने महाराष्ट्राच्या तरुणांवर अन्याय झाला, पण भाजपचे नेते मात्र मौन बाळगून गप्प बसले आहेत. देवेंद्र फडणवीस हे सातत्याने ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ म्हणतात आणि राज्यात येणारी गुंतवणूक मात्र इतर राज्यात जाते, याची महायुतीच्या नेत्यांना लाज वाटायला पाहिजे, अशा शब्दांत सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर हल्ला केला.
बेरोजगारांच्या आत्महत्या
महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण मोठे असताना महाराष्ट्रातील गुंतवणूक दुसऱ्या राज्यात जाऊ देणे हे लाजीरवाणे आहे. बेरोजगारीमुळे तरुणांच्या आत्महत्या वाढल्या असून 1 हजार 764 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.
…यामुळेच आपल्याला परिवर्तन घडवायचंय! – आदित्य ठाकरे
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही एक्सवर पोस्ट करून भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. एअर बस टाटा प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून शिवसेना आणि महाविकास आघाडी प्रयत्नशील होती, पण भाजपने तो दुसऱ्या राज्यात ढकलला, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात निवडणुका आहेत… हा तोच प्लांट आहे ज्यासाठी महाराष्ट्र म्हणून आपण सर्व प्रयत्नशील होतो. नागपूर इथे हा प्लांट आला असता, पण भाजपने ढकलला दुसऱया राज्यात! माहितीये कुठे?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. असे उद्योग तिथे पाठवून, आज हाच महाराष्ट्रद्वेष भाजपाच्या मनात साजरा होतोय आणि इथे एकनाथ शिंदे हे सुरतला ‘थँक यू’ म्हणताहेत. यामुळेच आपल्याला परिवर्तन घडवायचंय, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List