शिवसेना फॉर्मात… महाविकास आघाडी जोरात! वाघ निघाले… वाजतगाजत जंगी मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल
महाराष्ट्राची महालढाई सुरू झाली असून विधानसभा निवडणुकीच्या आखाडय़ात उतरताना अर्ज भरण्यासाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आज गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त साधला. यानिमित्ताने शिवसेनेच्या वाघांची डरकाळी घुमली. मुंबई, ठाणे, कोकण, नाशिकमध्ये रस्त्यांवर भगवं तुफान आलं. सर्वत्र मशालीचं तेज पाहायला मिळालं. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विराट मिरवणुकीने जात वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांनीही आज अर्ज भरले.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज राज्यभरात उत्साह पाहायला मिळाला. मुंबईत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतून तर शिवसेनेचे संजय पोतनीस यांनी कलिनातून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. पोतनीस यांनी भव्य मिरवणुकीने जात आपला अर्ज भरला. यावेळी खासदार वर्षा गायकवाड, विभागप्रमुख महेश पेडणेकर उपस्थित होते.
z शिवसेनेचे के. पी. पाटील यांनी राधानगरीतून तर दिलीप सोपल यांनी बार्शीतून अर्ज भरले.
मुंब्य्रात शरद पवार यांच्या उपस्थितीत रॅली
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कळवा-मुंब्य्रात आज प्रचंड रॅली काढण्यात आली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी खासदार बाळ्यामामा म्हात्रे, शानू पठाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास देसाई, मनोज प्रधान यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
कोकणात आवाज शिवसेनेचा
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात आवाज शिवसेनेचाच असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. भव्य मिरवणुकीने शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी गुहागरमधून, उपनेते राजन साळवी यांनी राजापूरमधून, वैभव नाईक यांनी कुडाळमधून तर संजय कदम यांनी दापोलीतून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी वातावरण भगवेमय झाले होते. चारही उमेदवारांनी यावेळी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
ठाण्यात भगवा उत्साह
ठाणे मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी आज भगव्या उत्साहात सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर शक्तिस्थळावर धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले. यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नरेश मणेरा, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, नंदिनी विचारे, धनश्री विचारे, मंदार विचारे, संजय तरे आदी उपस्थित होते.
कल्याण ग्रामीणमध्ये ढोल–ताशांचा गजर
कल्याण ग्रामीणमधून ढोल-ताशांचा गजर करीत शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे अर्ज दाखल केला. या वेळी संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर, धनंजय बोडारे, शहरप्रमुख अभिजित सावंत, मुकेश पाटील, वसंत भगत यांच्यासह काँग्रेसचे संतोष केणे, राष्ट्रवादीचे वंडार पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मालेगावात शिवसेनेची हवा
नाशिकमधील मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अद्वय हिरे यानी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराजा सयाजीराव गायकवाड मैदानावर सभा झाली. या सभेला मोठी गर्दी उसळली होती. मालेगावच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही यावेळी हिरे यांनी दिली. यावेळी काँग्रेस खासदार शोभा बच्छाव, ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, राजेंद्र भोसले शुभांगी पाटील, संदीप पाटील, समाधान हिरे उपस्थित होते.
राजन विचारे, सुभाष भोईर, आव्हाड यांचे अर्ज
शिवसेना नेते राजन विचारे यांनी ठाण्यातून तर सुभाष भोईर यांनी कल्याण ग्रामीणमधून उमेदवारी अर्ज भरला. राष्ट्रवादीचे मुंब्य्रातील उमेदवार जितेंद्र आव्हाड व विक्रमगडचे सुनील भुसारा यांनीदेखील जल्लोषात अर्ज दाखल केले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची दणदणीत रॅली निघाली. भगवी उपरणी परिधान केलेल्या शिवसैनिकांच्या उत्साहाचा सूर तर टिपेला पोहोचला होता.
दिग्गज मैदानात
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूरमधून, हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधून, जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्य्रातून, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी तिवसातून वाजतगाजत मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल केले. येवल्यातून अजित पवार गटाचे छगन भुजबळ, कोरथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील, परळीसाठी धनंजय मुंडे, आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील यांनीही आपले अर्ज भरले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List