पिंपरीतील डी. वाय. पाटील रुग्णालय बॉम्बने उडवण्याची धमकी
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात ‘आयईडी’ स्फोटके ठेवली असून, रुग्णालय उडवून देऊ, अशा धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली. बुधवारी (दि. ६) सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पोलिसांची धावाधाव होऊन शहरात खळबळ उडाली. बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाला तत्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र, तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
पिंपरी येथील संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गोरख कुंभार यांनी याबाबत माहिती दिली. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या ई-मेल आयडीवर बुधवारी सकाळी एक ई-मेल प्राप्त झाला. सकाळी साडेअकराच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी ई-मेल तपासला असता, त्यात रुग्णालयात (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डीवाइस) बॉम्ब ठेवल्याचे तसेच रुग्णालय उडवण्याचे नमूद केल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच, संत तुकारामनगर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच, बॉम्ब शोधक- नाशक व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. पथकाकडून पाहणी करण्यात आली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
ई-मेल कोठून आला आणि कोणी केला होता, धमकी कशासाठी दिली, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. तसेच दहशतवादी संघटनांचा काही संबंध आहे का? याव्यतिरिक्त किती रुग्णालय किंवा अगर आस्थापनांना अशाप्रकारचा धमकीचा ई-मेल करण्यात आला आहे का, याबाबतही तपास केला जात आहे.
तीन महिन्यांपूर्वी रुग्णालयाला धमकी
निगडी पोलीस ठाण्यातील धन्वंतरी रुग्णालयालादेखील ऑगस्ट महिन्यात अशीच धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. रुग्णालयात बॉम्ब ठेवला असून, रुग्णालय उडवून देण्यात येईल, अशी धमकी त्यातून दिली होती. एका दहशतवादी संघटनेचे नावदेखील त्यात नमूद केले होते. त्यापाठोपाठ पिंपरी येथील डी. वाय. पाटील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला ई-मेलवरून धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List