काँग्रेसनं बंडोबांना ‘पंजा’त पकडलं; मविआच्या अधिकृत उमेदवाराविरोधातील बंडखोर 6 वर्षांसाठी निलंबित!
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना 6 वर्षांसाठी पक्षामधून निलंबित करण्यात आले आहे. राज्यात कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ठामपणे सांगितले.
वांद्रे कुर्ला संकुलात झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत लोकसेवेची पंचसुत्री जाहीर केलेली आहे, त्याचा घरोघरी जाऊन प्रचार केला जाईल. 10 नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत हे उपस्थित असतील.
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या गॅरंटी सरकार येताच लागू केल्या जातील. भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसच्या गॅरंटीविरोधात चुकीच्या व अफवा पसरवणाऱ्या खोट्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. अनेक वर्तमानपत्रात ही जाहिरात कोणी दिली त्याचे नाव नाही. याविरोधात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने ज्या गॅरंटी दिल्या त्याची अंमलबजावणी सुरु आहे पण भाजपा जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहे. महालक्ष्मी योजनेसह सर्व गॅरंटी जाहिर करताना त्याचा अभ्यास केला असून आर्थिक तरतूद कशी केली जाईल यावर सखोल चर्चा करुनच त्या जाहीर केल्या आहेत, असेही रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लेकसभेतील विरोधी पक्ष नेते राहिल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागांत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे पाच दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून 13, 14, 16, 17 व 18 नोव्हेंबरला राज्यातील विविध भागात त्यांच्या सभा होतील. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 12, 14 व 16 नोव्हेंबर रोजी प्रचार सभा घेणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या 13, 16 व 17 नोव्हेंबरला प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. तेलंगणा व कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे देशभरातील वरिष्ठ नेतेही प्रचारात उतरणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List