Assembly election 2024 – आघाडीच्या मजबुतीसाठी शिवसेनेची त्यागाची भूमिका!
पिंपरी- चिंचवड शहरात शिवसेनेला एक जागा मिळाली पाहिजे, अशी पक्षाची भूमिका होती. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यासाठी सातत्याने आग्रही होते. मात्र, आघाडी टिकली पाहिजे, आघाडी मजबुतीने पुढे जायला पाहिजे, त्यामुळे कमी जागा मिळाल्यानंतरही आम्ही आघाडीची भूमिका घेऊन पुढे जात आहोत, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी निगडी येथे व्यक्त केले.
निगडी, यमुनानगर येथे भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी आमदार अहिर बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार विलास लांडे, भोसरीचे उमेदवार अजित
गव्हाणे, शिवसेना महिला आघाडीच्या सुलभा उबाळे, संजोग वाघेरे, रवि लांडगे, तुषार कामठे आदी उपस्थित होते.
त्यागाची भूमिका काय असते, हे शिवसैनिकांनी दाखवून दिल्याचे सांगत आमदार अहिर पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कोणत्याही पदाची, महामंडळाची अपेक्षा नाही. कोणतीही ऑफर नको. विधानसभा, विधानपरिषद नको, शिवसैनिकांच्या याच विश्वासावर हा पक्ष जगविण्याचे काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत.
पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांच्यासाठी पिंपरीतही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कनेते आमदार सचिन अहिर, दत्तात्रय वाघेरे, मनोज कांबळे, रोमी संधू, युवराज दाखले, प्रदीप पवार, धम्मराज साळवे, इम्रान शेख, चेतन पवार, काँग्रेसच्या शहराध्यक्ष सायली नढे, अमोल निकम, हाजी दस्तगीर, अशोक मोरे, विश्रांती पाडाळे, बी. डी. यादव, अभिमन्यू दहीतुले, नरेंद्र बनसोडे, ज्योती निंबाळकर, उमेश खंदारे, शामला सोनवणे, अनिता
तुतारे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले, लोकसभेमध्ये आपण रात्री रात्री बँकांच्या शाखा उघड्या ठेवून काय झाले ते पाहिले. आता मला नवीनच माहिती मिळाली की, भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या ‘डिजिटल इंडिया’चा चांगलाच प्रचार सुरू आहे. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा झाल्यानंतर आता भाजपकडून या मतदारसंघात ‘डिजिटल लक्ष्मी दर्शन’ सुरू असल्याचा गंभीर आरोप खासदार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.
आमदारांनी महापालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले
शहरातील तीनही आमदारांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये आता पिंपरी-चिंचवड व भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List