कल्याण पश्चिमेत ‘आम्ही सारे बासरे’
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सचिन बासरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारीच्या घोषणेनंतर सचिन बासरे यांनी मतदारसंघात ‘आम्ही सारे बासरे’ ही मोहीम जोमाने राबवली आहे. या मोहिमेला बुधवारी बल्याणी चौक ते मोहोलीदरम्यान आयोजित पदयात्रेत चांगला प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
पदयात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी उत्स्फूर्तपणे आपला पाठिंबा जाहीर केला. विशेषतः महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी महिलांनी स्वतःच्या समस्या मांडल्या. वाढती महागाई, रोजगाराची कमतरता, महिला उद्योजकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.
महागाई व रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर महिलांचा आवाज बुलंद झाला आहे. त्यांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी मी स्वतःला झोकून देईन असे सचिन बासरे यांनी पदयात्रेनंतर स्पष्ट केले. या पदयात्रेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या उपशहर संघटक अस्मिता गोवळकर, विभाग संघटक रोहिणी काटकर, उपविभागप्रमुख संध्या ठोसर, शाखा संघटक शरयू सावंत आणि सुवर्णा आव्हाड उपस्थित होत्या.
आगामी निवडणुकीत महिला शक्ती निर्णायक
कल्याण पश्चिममधील आगामी विधानसभा निवडणुकीत महिलांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे या पदयात्रेवरून स्पष्ट झाले आहे. कल्याण पश्चिममधील महिलांनी आजच्या पदयात्रेत जो प्रचंड उत्साह दाखवला, तो येणाऱ्या निवडणुकीत बदलाचे संकेत देईल. सचिन बासरे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिममध्ये महिला सक्षमीकरणाचे स्वप्न साकार होईल असे बासरे यांनी सांगितले.
महिला सबलीकरणावर भर
महिला सक्षमीकरणासाठी व्यापक योजना आखण्यात येणार असल्याचेही बासरे यांनी जाहीर केले. ‘महिला उद्योगांचे व्यापक जाळे उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. महिलांनी पुढे येऊन आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत योगदान द्यावे,’ असे आवाहन बासरे यांनी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List