Maharashtra Assembly Election 2024 – उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास; शिवसेनेत जम्बो भरती!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. शिवसेनेत प्रवेशासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी आजही गर्दीचा ओघ कायम होता. अनेक पक्ष आणि संघटनांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेची मशाल हाती घेत आहेत. जम्बो भरतीसारखा उत्साह यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.
धगधगत्या मशालीने भ्रष्टाचारी सरकार जाळून टाका! शिवशाही परत आणा!!
गेले काही दिवस ‘मातोश्री’त इनकमिंग जोरात सुरू आहे. माझ्यावर नेहमी टीका होते की, मी घरी बसून काम करतो; पण संपूर्ण दुनिया जर माझ्या घरी येत असेल तर माझ्यासारखा भाग्यवान कुणी नाही, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. ‘शिवसेना आणि महाविकास आघाडीचा विजय आता नक्की झालाय, पण गाफील राहू नका. समोरचा शत्रू असा तसा हार मानणार नाही. सर्व करामत्या करेल. साम दाम दंड भेद अशा सगळ्या उचापत्या करून जिंकण्याचा प्रयत्न करेल. पण जागे राहिलात, मशालीसारखे धगधगते राहिलात तर तो तुमच्या आसपासही येऊ शकणार नाही. शिवसेनेची धगधगती मशाल घराघरात न्या.
हीच मशाल घेऊन भ्रष्टाचारी सरकार आणि भ्रष्टाचाराला जाळून टाका आणि आपले शिवशाहीचे सरकार परत आणा,’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना केले. संकटाच्या छाताडावर चालून जा असे प्रबोधनकार म्हणायचे. गद्दारांनी शिवसेना पक्ष चोरला, चिन्ह चोरले, सर्व काही चोरले. संकट उभे केले, पण संकटापूर्वी जी शिवसेना होती ती आता कित्येक पटीने मोठी झाली आहे. सर्व लढवय्ये शिवसेनेत येत आहेत,’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
राधानगरीचे माजी आमदार के. पी. पाटील शिवबंधनात
कोल्हापूरमधील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी आज शिवसेनेची मशाल हाती घेतली. ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत के. पी. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते. राधानगरी आता शिवसेनेचीच असेल, असा विश्वास यावेळी के. पी. पाटील आणि सहकाऱ्यांनी व्यक्त केला.
नगरमध्ये शिवसेनेचा अजित पवार गटाला धक्का
श्रीगोंदा विधानसभेतील अजित पवार गटाच्या नगर जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे यांनी आज त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, उपनेते साजन पाचपुते आणि पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले.
उद्धव ठाकरे यांनी साजन पाचपुते यांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, साजन यांच्यासाठीच श्रीगोंद्याची जागा आपण हट्ट करून मागितली. पण चार दिवसांपूर्वी ते आले आणि म्हणाले की, एकदा श्रीगोंदा मतदारसंघ जिंकला की पुढील पन्नास वर्षे आपण सोडत नाही. त्यासाठी काही गणिते बदलावी लागतील. अशी माणसे फार विरळ असतात.
श्रीगोंद्यात शंभर टक्के मशाल धगधगणार – संजय राऊत
साजन पाचपुते आणि नागवडे परिवार एकत्र आल्याने श्रीगोंद्यामध्ये आता शंभर टक्के मशाल धगधगल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. ‘नागवडे कुटुंबीयांनी आज शिवसेनेत प्रवेश करून नव्या राजकीय पर्वाची सुरुवात केली आहे. त्यांच्या रूपाने श्रीगोंद्यात शिवसेनेला नवे नेतृत्व मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या आगामी सरकारमध्ये श्रीगोंद्याच्या आमदाराचा समावेश असलाच पाहिजे आणि त्यासाठी मशाल हाती घेऊन कामाला लागा,’ असे संजय राऊत म्हणाले.
बाळ माने, अपूर्व हिरे, जयश्री शेळके शिवसेनेत
भाजपचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळ माने, बुलढाणा येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव अॅड. जयश्री शेळके, अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाती शिवबंधन बांधून सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसेना संघटक एकनाथ पवार, खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, बुलढाणा सहसंपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, बुलढाणा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List