सर्व दहशतवाद्यांना ठार करा, ‘शूट एट साइट’चे आदेश द्या…मोने, जोशी, लेले कुटुंबियांची मागणी
पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यातील सहा जण महाराष्ट्रातील आहेत. डोंबिवली येथील अतुल मोने आणि त्यांचे नातेवाईक हेमंत जोशी आणि संजय लेले यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नेमकी घटना कशी घडली? त्याबद्दल माहिती दिली. सर्व अतिरेक्यांना ठार करा, ‘शूट एट साइट’चे आदेश द्या, अशी मागणी अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांच्या कुटुंबियांनी केली.
संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यांच्या हाताला गोळी लागून गेली होती. त्यांनी त्या दिवशी नेमके काय घडले? त्या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २१ तारखेला आम्ही पहलगाममध्ये पोहचला. त्या परिसरात फिरलो. अचानक आम्हाला गोळीबाराचा आवाज आला. सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केले. त्यानंतर गोळीबारचा आवाज वाढू लागला होता. आम्ही थांबलेल्या ठिकाणी दहशतवादी आले. हिंदू वेगळे आणि मुस्लीम वेगळे व्हा, असे आम्हाला सांगितले. त्यावेळी माझ्या मामांनी सांगितले, आम्हाला जाऊ द्या, आम्ही काहीच करणार नाही. त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या. माझ्या वडिलांनी हात वर केला तर त्यांच्या डोक्यात गोळी मारली. माझा हात त्यावेळी वडिलांच्या डोक्याजवळ होता. मला वाटले मला गोळी लागली. मी खाली पडलो. ती गोळी माझ्या हातावर लागली होती. परंतु मी जेव्हा उठलो तेव्हा पाहिले माझ्या बाबांचे डोके पूर्ण रक्ताने माखलेले होते. स्थानिक लोकांनी आम्हाला त्या ठिकाणावरुन दुसरीकडे पाठवले. महिलांना घोड्यावरुन खाली पाठवले. आम्ही चालत आलो. माझ्यावर रुग्णालयात उपचार झाले. आम्हाला घटनेची काहीच माहिती दिली गेली नव्हती. पोलीस कंट्रोल रुममध्ये आम्हाला आणण्यात आले होते. त्याठिकाणी गृहमंत्री अमित शाह सर्वांची चौकशी करत होते. सकाळी सात वाजता मृतांची ओळख पटल्याचे सांगितले. या घटनेत आमच्या तिन्ही नातेवाईकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. गोळीबार करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना मी स्वत: पाहिले, असे हर्षल लेले यांनी सांगितले.
अनुष्का मोने यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, दुपारी एक ते दीड वाजेची वेळ होती. आम्ही सर्व आनंदात होते. फोटो काढत होते. त्यावेळी दहशतवादी आले. हिंदू कोण विचारले? आमच्या समोर सर्वांना मारले. आम्ही काहीच करु शकले नाही. ते दहशतवादी बोलत होते, तुम्ही या ठिकाणी दहशत माजवण्यास येतात…त्यांचा पर्यटकांवर राग दिसत होता, असे अनुष्का मोने यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List