पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले नेटकरी; म्हणाली “माझंही रक्त खवळतं..”
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात दु:खाचं, भीतीचं आणि शोकाकुल वातावरण आहे. देशवासियांच्या मनात रागसुद्धा आहे. दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जातेय. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत. अशातच अभिनेत्री रिधी डोग्रानेही सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. ‘मला असं वाटतं की चांगल्या मुस्लिमांनी पुढे येऊन हैवानांना नाकारण्याची गरज आहे. अशा लोकांसोबत आणि जागेसोबत कायमचं नातं सोडा, जे गप्प आहेत आणि खोलवर कुठेतरी दुसरीकडे जोडलेले आहेत’, असं तिने त्यात म्हटलंय. रिधीच्या या पोस्टवरून तिलाच नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. कारण इतरांना संबंध तोडण्याचा सल्ला देणाऱ्या रिधीने स्वत: पाकिस्तानी कलाकार फवाद खानसोबत काम केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. या ट्रोलिंगवरही रिधीने उत्तर दिलं आहे.
रिधी डोग्राची पोस्ट-
‘मला असं वाटतं की चांगल्या मुस्लिमांनी पुढे येऊन हैवानांना नाकारण्याची गरज आहे. अशा लोकांसोबत आणि जागेसोबत कायमचं नातं सोडा, जे गप्प आहेत आणि खोलवर कुठेतरी दुसरीकडे जोडलेले आहेत. कारण सातत्याने एकाच जागेपासून दहशतवादी येतायत. ते माणुसकीला उद्ध्वस्त करतायत. ते विश्वासाला तडा देतायत. काश्मीरचं सौंदर्य खुलतं होतं आणि सरकारने खूप प्रयत्न केले होते. व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक प्लॅन्स तयार होते. पण आपल्या सर्वांना माहीत आहे की हे सर्व कोणाला नकोय? हे खूप वैयक्तिक मत आहे, परंतु माणुसकीच्या नावाखाली राक्षसांसोबत चांगलं वागणं थांबवण्याची वेळ आली आहे. भारतासाठी उभे राहा,’ असं तिने लिहिलंय.
रिधीच्या या पोस्टनंतर पाकिस्तानी कलाकार फवाद खानसोबत तिच्या काम करण्यावरून नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. ‘ही स्वत: फवाद खानसोबत काम करतेय’, असं एकाने लिहिलं. तर ‘सुरुवात स्वत:पासून कर’, असं दुसऱ्याने म्हटलंय. या टीकेवर रिधीने उत्तर दिलं आहे. तिने लिहिलं, ‘जेव्हा माझ्या सरकाराने मला परवागनी दिली होती, तेव्हा मी काम केलं होतं. मी कायदा आणि नियमांसोबत उभी आहे. परंतु मला हेसुद्धा माहीत आहे की शांतीसुद्धा गरजेचं आहे. मी जम्मू-काश्मीरची मुलगी आहे. जिथे हे घडलंय आणि मला अशा क्रूर गुन्हेगारांच्या इतिहासाविषयी माहिती आहे. गेल्या काही वर्षांत माझंही रक्त खवळलंय. त्यामुळे मी तुमच्याशी एक देशवासियाच्या नात्याने बोलतेय.’
‘मी माझ्या कामामुळे गप्प राहणार नाही. मला शांतपणे काम करायचं आहे. त्यामुळे माझ्यावर तुमचा राग वाया घालवू नका. मलासुद्धा इतरांइतकाच राग आलाय. मी फक्त इतरांचा आदर करतेय’, असं तिने स्पष्ट केलं. दरम्यान पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकार फवाद खानची भूमिका असलेल्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सूत्रांनी याबद्दलची माहिती दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List