कोनेरू हम्पीला विजेतेपद
हिंदुस्थानची अव्वल महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी व चीनची झू जीनर या दोघींनी नवव्या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवल्यामुळे झालेल्या गुण बरोबरीनंतर हम्पीने टायब्रेकर गुणांच्या आधारावर फिडे महिला ग्रँड प्रिक्स (ग्रां-प्री) बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यातील विजेतेपद पटकाविले. झू जीनरला उपविजेतेपदावस समाधान मानावे लागले.
अमनोरा द फर्न (हडपसर) येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत आज नवव्या फेरीत कोनेरू हम्पीने सालिनोव्हा न्यूरघ्युनवर, तर झू जीनरने पोलिना शुव्हालोवावर निर्णायक विजय मिळविल्यावर हम्पी व जीनर या दोघीही 7 गुणांसह संयुक्तरीत्या आघाडीवर राहिल्या. त्यामुळे विजेतेपद निश्चित करण्यासाठी टाय ब्रेकर गुणांचा अवलंब करण्यात आला. यामध्ये हम्पीने बाजी मारली.
मात्र विजेतेपदाची पारितोषिक रक्कम व ग्रां-प्री मानांकन गुण दोघींनाही विभागून देण्यात आले. दोघींनीही या स्पर्धेतून प्रत्येकी 117.5 मानांकन गुणांची कमाई केली. या स्पर्धा मालिकेतील अखेरचा सहावा टप्पा पुढच्या महिन्यात ऑस्ट्रिया येथे होणार आहे.
वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या 19 वर्षीय दिव्या देशमुख हिने चार विजय तीन बरोबरी आणि 2 पराभव अशा कामगिरीसह 5.5 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. तिचे दोन पराभव हम्पी व जीनर यांच्याविरुद्धच होते.
कँडिडेट स्पर्धेसाठी अलेक्सेंड्रा गोरायचिंका 308.8 गुणांसह अव्वल स्थानासह आपला प्रवेश निश्चित केला असून हम्पी 279.17 गुणांसह तिच्या पाठोपाठ आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List