सराईतांविरुद्ध पुणे पोलिसांची टेक्नोसॅव्ही मोहीम; विश्लेषणाच्या अत्याधुनिक मदतीने ठेवला जाणार वॉच, अदखलपात्र गुन्ह्यांचे बारकावे तपासणार
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत विश्लेषणाच्या मदतीने सराईतांवर टेक्नोसॅव्ही मोहिमेद्वारे पोलिसांकडून वॉच ठेवला जाणार आहे. विशेषतः गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर गुंडाविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांनी उपाययोजना हाती घेतली आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्याविरुद्ध परिणामकारक कारवाई करण्यास मदत होणार आहे. तसेच सराईतांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यास त्यातील बारकावे तपासून, संबंधितांवर दखलपात्र गुन्ह्यांसाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
सराईतांकडून नागरिकांना धमकावल्याप्रकरणी काही वेळेस पोलीस ठाणे स्तरावर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे केले जातात. ते गुन्हे अदखलपात्र स्वरूपात (नॉन कॉग्निजेबल) मोडतात. अशा प्रकारचे गुन्हे तपासून सराईतांविरुद्ध दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे आदेश जारी केले आहेत. गुन्हेगाराविरुद्ध दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्यास त्याच्याविरुद्ध भविष्यात ‘एमपीडीएसह ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) तडीपारीची कारवाई अधिक परिणामकारक पद्धतीने करता येणार आहे. दरम्यान, पुणे पोलिसांकडून सराईतांसह टोळ्यांविरुद्ध कारवाईचा वेगाने बडगा उगारण्यात आला आहे. तांत्रिक विश्लेषणानुसार सराईतांचे वास्तव्याचे ठिकाण, त्यांचे नातेवाईक अन्य माहिती संकलित करण्याचे काम प्रगतीवर आहे.
तडीपार गुंडांवर राहणार करडी नजर
दादागिरीसह दहशत माजविणाऱ्यांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले जाते. मात्र, अनेकदा संबंधित तडीपार पुन्हा शहरात वास्तव्यास येत असल्याचे आढळून आले. मागील तीन वर्षांत जवळपास ८०० गुंडांनी तडीपारीचा आदेश भंग केल्याचे आढळून आले होते. त्या पार्श्वभूमीवर संबंधित तडीपार गुंडांवर वॉच ठेवण्यासाठी ठाणे प्रमुखांनी विशेष प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत.
नागरिकांनो गुंडांविरुद्ध तक्रार करा- अपर आयुक्त शैलेश बलकवडे
नागरिक, व्यापाऱ्यांना काही वेळेस धमकाविण्याचे प्रकार घडतात. त्या पार्श्वभूमीवर कोणीही गुंडांना न घाबरता त्यांची त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी केले आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे, त्यांना आधार देण्यासाठी वस्ती भागात पोलिसांनी बैठका घेऊन मार्गदर्शन करण्याच्या सूचना स्थानिक पोलीस ठाणे प्रमुखांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार ३७ हजार सराईतांची माहिती संकलित केली आहे. त्यापैकी ४ हजार ४०० गुंड पोलिसांच्या यादीत (टॉपलिस्ट) आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पेट्रोलिंग करणाऱ्या पथकाकडून गुन्हेगारांच्या नियमित तपासणीला प्राधान्य देण्यात आले आहे.
नागरिकांची सुरक्षिततेसह कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सराईतांसह गुन्हेगारी टोळ्यांवर बारकाईने वॉच ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यानुसार डेटा एकत्रित केला आहे. गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांकडून अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणाद्वारे वॉच ठेवून कारवाईला गती दिली जात आहे.
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List