‘आई कुठे काय करते’मधील खलनायिका आता किचन गाजवणार; क्षणार्धात शोसाठी दिला होकार
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत खलनायकी भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शिट्टी वाजली रे’ या नव्या कार्यक्रमात ती चक्क स्वयंपाक करताना दिसणार आहे. मालिकेत संजनाला स्वयंपाकाची जराही आवड नव्हती, मात्र रुपाली उत्तम स्वयंपाक बनवते. ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाचा मंच रुपालीमध्ये दडलेली सुगरण संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणणार आहे. रुपाली भोसलेनं ‘संजना’च्या भूमिकेतून सबंध महाराष्ट्रात ओळख मिळवली. आता या नव्या कार्यक्रमातून ती आपली विशेष छाप कशी सोडणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाविषयी सांगताना रुपाली म्हणाली, “मला स्वयंपाकाची अतिशय आवड आहे. मला जेवण बनवायलाही आवडतं आणि खाऊ घालायलाही आवडतं. मी किचनमध्ये तासनतास रमते. शिट्टी वाजली रे कार्यक्रमासाठी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी लगेच होकार दिला. स्वयंपाक ही आवडीची गोष्ट असल्यामुळे माझ्यासाठी हा मंच खूप खास असणार आहे. कार्यक्रमाची टीम अतरंगी आहे. आम्ही सगळे खूप कल्ला करणार आहोत. प्रेक्षकांना पोटभरुन हसवणं हेच या कार्यक्रमाचं वेगळेपण असेल.”
कलाकारांचं कलाकौशल्य आपण मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून पाहतच असतो. मात्र त्यांचं आजवर कधीही न पाहिलेलं पाककौशल्य ‘शिट्टी वाजली रे’च्या मंचावरून पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर येणार आहे. सहजरित्या आपल्या अभिनयाने आणि नृत्याने मनं जिंकणारे हे कलाकार स्वयंपाकात खरंच कुशल आहेत का याची पोलखोल ‘शिट्टी वाजली रे’चा मंच करणार आहे. थोडक्यात काय पोटभर खायला घालणारी नाही तर स्वयंपाक करता करता पोटभर हसवणाऱ्या कलाकार जोडीचा शोध हा कार्यक्रम घेणार आहे. लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करणार असून पूर्णब्रह्म या मराठी रेस्टॉरंटच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील. ‘शिट्टी वाजली रे’ हा कार्यक्रम येत्या 26 एप्रिल पासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List