’14 एप्रिल.. माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट दिवस’; अपूर्वा नेमळेकरची भावूक पोस्ट
प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा भाऊ ओमकार नेमळेकर याचं 14 एप्रिल 2023 रोजी वयाच्या 28 व्या वर्षी निधन झालं होतं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याने आपले प्राम गमावले होते. आपल्या भावासाठी अपूर्वाने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे.
'14 एप्रिल- ज्या दिवसाने सर्वकाही बदललं. फक्त माझ्या लहान भावालाच नाही तर माझ्या आत्म्याच्या एका भागाला गमावून आज दोन वर्षे झाली. असा एकही दिवस गेला नाही, जेव्हा मला तुझी आठवण आली नसेल, ओमकार. दररोज सकाळी मी हीच इच्छा मागते की कदाचित नशिबाने थोडी दया दाखवायला हवी होती, कदाचित.. कदाचित मी परत जाऊन तो एक दिवस बदलू शकले असते. 14 एप्रिल 2023.. माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट दिवस', अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.
'माझ्यापेक्षा वयाने लहान असलास तरी तू माझा मार्गदर्शक, माझा सर्वांत चांगला मित्र, माझा टीकाकार आणि ज्ञानाचा साठा होतास. तू माझा आधारस्तंभ होतास, ज्याच्याकडे मी माझी सर्वसामान्य किंवा अत्यंत क्लिष्ट अशा प्रश्नांची उत्तरं शोधू शकत होते. एका भावापेक्षाही तू बरंच काही होतास. तू माझा साथीदार आणि माझी सुरक्षित जागा होतास,' असं तिने पुढे लिहिलंय.
भावाला गमावल्याचं दु:ख व्यक्त करत अपूर्वाने म्हटलंय, 'या दोन वर्षांत मी खूप काही गमावले आहे. असे असंख्य क्षण आले जेव्हा मी आजूबाजूला पाहिलं आणि तू तिथे हसत, चिडवत, सल्ला देत किंवा जसा आहेस तसा असायला हवं होतं अशी इच्छा व्यक्त केली. आयुष्य पुढे गेलंय, पण मी अजूनही पुढे गेले नाही. मी खरंच कधी पुढे जाईन असं मला वाटत नाही.'
'मी काहीही करू न शकल्याची अपराधीपणाची भावना सतत मनात रेंगाळत राहते. या भावनेनं दररोज माझं हृदय जड होतं. तू जिथे कुठे असशील तिथे शांतीने असशील अशी मी अपेक्षा करते. पण तू नसल्याचं दु:ख माझ्यासोबत कायम असेल. तुझी प्रचंड आठवण येते, ओम. तू इथे असायला पाहिजे होतंस, असं मला खूप वाटतं,' अशा शब्दांत अपूर्वाने दु:ख व्यक्त केलंय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List