‘फुले’ सिनेमावरुन राजकारण तापलं, छगन भुजबळ म्हणाले, ‘काही कर्मठ ब्राह्मण…’
‘फुले’ सिनेमा गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमा 11 एप्रिल रोजी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी प्रदर्शित होणारा होता. पण सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे ‘फुले’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख 25 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यावर आता राजकीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. राष्ट्रावादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील ‘फुले’ सिनेमावरुन होणाऱ्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या छगन भुजबळ यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
फुले सिनेमातील एकही सीन कट होता कामा नये… त्यावेळी सगळेच ब्राह्मण महात्मा फुलेंविरोधात नव्हते…असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. ‘फुले’ सिनेमाला होणार विरोध लक्षात घेत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिला आहे. भुजबळ म्हणाले, ‘आम्ही स्पष्ट सांगितलं आहे की सिनेमातील एकही सीन कट होता कामा नये… कारण जे सत्य आहे तेच सिनेमात दाखवलेलं आहे…’
भुजबळ पुढे म्हणाले, ‘आजच्या ब्रह्मणांवर आम्ही निशाणा साधत नाही. त्यावेळी परिस्थिती काय होती. त्यावेळी देखील सर्वात ब्राह्मण ज्योतिबा यांच्या विरोधात नव्हते. अनेकांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची मदत केली आहे. काही कर्मठ ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात होते… असं देखील भुजबळ यावेळी म्हणाले आहेत.
‘फुले’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेता प्रतिक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा मुख्य भूमिकेत आहेत. महात्मा जोतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ हा चरित्रात्मक हिंदी सिनेमा सध्या वादळाच्या केंद्रस्थानी सापडला आहे. त्यामुळेच महात्मा फुले जयंतीला प्रदर्शित होणार असलेला हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला.
काय म्हणाले सिनेमाचे दिग्दर्शक?
‘फुले’ सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘सेन्सॉर बोर्डाने काही सुधार सांगितले आहेत. जे आम्ही देखील स्वीकार केले आहे. सिनेमातील एकाही सीनवर कात्री फिरवण्यात आलेली नाही. हा एक शैक्षणिक सिनेमा आहे आणि विशेषतः तरुणांनी तो जरूर पाहावा.’
पुढे दिग्दर्शक म्हणाले, ‘काही संघटनांनी सोशल मीडियावर स्वतःचं मत व्यक्त केलं, ज्यामुळे काहींचीही दिशाभूल झाली. आम्हाला कोणत्याही कारणास्तव हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकू द्यायचा नाही, म्हणून आम्ही प्रदर्शनाची तारीख दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.’
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List