पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही; ओमर अब्दुल्ला यांची खंत
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जम्मू-काश्मीरच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडून हल्ल्यातील मृत पर्यटकांबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. या घटनेबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असेही ते म्हणाले. या हल्ल्यातले पीडित मला विचारत आहेत, आमचा काय दोष होता? यातले काही आपल्या परिवारासोबत आले होते. कोणाचं नवीन लग्न झालेलं होतं, आनंदाने सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या या निष्पाप लोकांचा काय दोष होता? अशी खंत ओमर अब्दुल्ला यांनी बोलताना व्यक्त केली. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या एक दिवसाच्या विशेष अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी ओमर अब्दुल्ला यांनी आमदारांसह मौन पाळले.
ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत राजकारण करण्याची गरज नाही. या गंभीर मुद्द्यावर देशाने एकजूट दाखवण्याची गरज आहे. ही वेळ एकत्र राहण्याची आहे. राजकारणाची ही वेळ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या अनेक मागण्या आहेत. मात्र, आता या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची गरज आहे. या घटनेने जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण आहे.
केंद्र आणि विरोधी पक्षांमध्ये राज्यासाठी विशेष दर्जाची मागणी हा दीर्घकाळापासूनचा मुद्दा आहे. जम्मू आणि काश्मीर निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्यात कलम 370 ची पुनर्स्थापना, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करणे आणि स्वायत्ततेच्या ठरावाची अंमलबजावणी ही प्रमुख आश्वासने आहेत. नॅशनल कॉन्फरन्स कश्मीरला विशेष राज्याचा दर्जासाठी आग्रही आहे. मात्र,या बिकट काळात ही मागणी करण्याची ही वेळ नाहीय
नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. पर्यटकांची सुरक्षा आणि संरक्षण यावर लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोणीही या हल्ल्याचे समर्थन करत नाही. या हल्ल्याने राज्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या 26 वर्षांत मी कधीही लोकांना अशा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बाहेर पडताना पाहिले नाही. निदर्शने स्वेच्छेने केली जात होती, लोक बॅनर, पोस्टर घेऊन आणि दहशतवादाविरुद्ध घोषणा देत होते.
जनता आपल्याला पाठिंबा देईल, तेव्हा दहशतवाद आणि दहशतवाद संपेल. ही त्याची सुरुवात आहे. आदिलने आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक पर्यटकांना वाचवले. पळून जाण्याऐवजी त्याने पर्यटकांना वाचवण्याचा निर्णय घेतला. पर्यटकांना वाचवणाऱ्या आणि जखमींना रुग्णालयात नेणाऱ्या पोनी वाला, मोफत जेवण देणाऱ्या फूड स्टॉल मालकांचे आणि काश्मिरी आदरातिथ्याच्या व्यापक भावनेचेही त्यांनी कौतुक केले. आपण या लोकांना सलाम करतो. हेच आमचे आदरातिथ्य आहे, असेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List